Friday, November 22, 2024
Homeनगरकर्जाला कंटाळून बांधकाम मजुराचा आत्महत्येचा प्रयत्न

कर्जाला कंटाळून बांधकाम मजुराचा आत्महत्येचा प्रयत्न

भोकरची घटना || सावकार, बँका, फायनान्स कंपन्यांचा कर्जवसुलीसाठी तगादा

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील रवींद्र धामोरे या 48 वर्षीय बांधकाम मजुराने खाजगी सावकारांचा दररोजचा तगादा, बँका व फायनान्स कंपनीच्या नोटिसामुळे कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी पदार्थ घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्यांना श्रीरामपूर येथील साखर कामगार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे.
भोकर येथे राहत असलेले रवींद्र कारभारी धामोरे हे बांधकाम मजूर गवंडी काम करतात, त्या बरोबर घराजवळ एक छोटेसे जनरल स्टोअर्स व दुग्ध व्यासायीक म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु कोविड काळात व्यवसायावर मोठा विपरीत परीणाम झाल्याने त्यांनी कर्ज काढण्यास सुरूवात केली.

- Advertisement -

कधी बचत गटांना कर्ज देणारे फायनान्स कंपनी, कधी बँकेचे कर्ज व हे कर्ज फेडण्यासाठी खासगी सावकारांकडून घेतलेले कर्ज असे करता करता कर्जाचा डोंगर वाढला. त्यातच पत्नीच्या आजारपणाची भर पडली, गेल्या महिन्यातच पत्नीच्या उपचारासाठी आलेला मोठा खर्च व कर्ज फेडण्याचे साधन कमी पडू लागल्याने हवालदिल झालेले रवींद्र धामोरे हे सोमवारी पहाटेच कुटुंंबाला काहीही न सांगता बाहेरगावी गेले होते. तेथून काल बुधवार दि.28 ऑगस्टच्या सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान भोकर येथे राहत्या घरी पोहचले.

त्यावेळी पत्नी व मुलगा त्यांची पत्नीच्या ड्रेसींगसाठी गावातील डॉक्टराकडे गेलेले असताना वैफल्यग्रस्त झालेल्या या बांधकाम मजूराने पत्नी व मुलगा घरी येण्यापूर्वीच विषारी औषध सेवन केलेे. काही वेळात घरी आलेले पत्नी व मुलगा यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी लागलीच धामोरे यांचे मेहुणे राजेंद्र वाकडे यांच्याशी संपर्क केला अन् नातेवाईकांनी लागलीच रवींद्र धामोरे यांना उपचारासाठी श्रीरामपूर येथील साखर कामगार हॉस्पीटलमध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

धामोरे यांचे घरात विविध फायनान्स कंपनी व बँकेच्या मिळालेल्या नोटीसी नुसार सुमारे नऊ लाखांपेक्षा जास्त कर्जाच्या नोटीसा आल्या असल्याचे आढळून आले त्याच बरोबर घरी नेहमी खाजगी सावकारांचा तगादा असायचा त्यानुसार खासगी सावकारांचे ही मोठ्या प्रमाणात कर्ज असल्याने या बांधकाम मजूराने हा अखेरचा मार्ग निवडल्याची चर्चा सध्या परीसरात सुरू आहे. गेल्या महिन्यात टाकळीभान येथील एका मेडीकल व्यावसायीकाने ही असाच प्रयत्न केलेला असल्याने आता या बांधकाम मजूराने ही हा मार्ग निवडल्याने खाजगी सावकारकीचे कर्ज व बेराजगारी यामुळे सर्वसामान्याचे जीवन जगणे मुश्कील झाल्याचे यावरून दिसत आहे. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत तालुका पोलीसा गुन्हा दाखल नव्हता.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या