Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्यापार्किंगला जागा मिळेना; वाहतुकीचा बट्ट्याबोळ

पार्किंगला जागा मिळेना; वाहतुकीचा बट्ट्याबोळ

पंचवटी । वार्ताहर Panchavati

पंचवटीत ( Panchavati )संपूर्ण भारतातून भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात. मात्र, पंचवटीत प्रवेश करताना त्यांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. मालेगाव, धुळे, जळगाव भागाकडून येणार्‍या वाहनधारकांना आडगाव नाका काट्या मारुतीजवळ अक्षरशः कसरत करावी लागते. हिरावाडी, निमाणी, गणेशवाडीकडून येणार्‍या वाहनांची या ठिकाणी प्रचंड झुंबड उडालेली दिसून येते.

- Advertisement -

येथे सायंकाळच्या वेळेस वाहतूक पोलीस असतात. मात्र वाहतूक नियंत्रण करण्याऐवजी हेल्मेट व सीटबेल्ट नसलेल्या वाहनचालकांना दंड करण्यात व्यस्त असतात. त्यामुळे स्वतः वाहनचालकांनाच सर्कस करून आपल्या वाहनांना मार्ग काढावा लागतो. पुढे गेल्यानंतर निमाणी बसस्थानकातून सर्व नाशिकभर सिटीलिंक बसचा प्रवास सुरू होतो. या ठिकाणी निमाणीसमोरील व्यापारी संकुलात अनेक दवाखाने, ऑफिस, दुकाने असल्यामुळे हजारो वाहने या ठिकाणी पार्किंग केलेली असतात. त्यात अनेक फेरीवाल्यांनी आपली दुकाने रस्त्यावरच थाटल्यामुळे वाहन काढणे जिकिरीचे होते. दिंडोरी नाकाही यातून सुटत नाही.

प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांचा या ठिकाणी गराडा असतो. प्रत्येक वाहनधारक आपापसात भांडताना दिसून येतात. पंचवटी कारंजा ते रविवार कारंजाचा रस्ता इतका मोठा आहे की एका वेळेस एका बाजूने तीन गाड्या जातील. एवढा मोठा रस्ता असूनसुद्धा त्या ठिकाणी गाळेधारकांनी आपल्या दुकानांच्या नावाचे बोर्ड रस्त्यावर लावून ठेवले असल्याने तसेच फळविक्रेत्यांनी आपल्या हातगाड्या रस्त्यावर लावल्यामुळे वाहनधारकांनादेखील प्रश्न पडतो आपली वाहने कुठे पार्क करावी. एवढे मोठे रस्ते असूनसुद्धा रहदारीला अडथळा निर्माण होत असेल तर अतिक्रमण विभाग झोपला आहे का? असा सवाल नागरिक करताना दिसून येत आहेत.

सिटीलिंकच्या बसला सीबीएस ते निमाणी तीन ते चार किलोमीटर अंतर कापण्यासाठी चक्क 40 ते 50 मिनिटे लागतात. सायंकाळी वाहतूककोंडी ही समस्या पंचवटीकरांसाठी कायमची डोकेदुखी आहे. रामकुंड परिसरात सकाळी दशक्रिया विधीसाठी येणार्‍या नागरिकांनादेखील वाहन पार्किंगचा मोठा प्रश्न भेडसावताना दिसून येतो.

वाहतूककोंडीची ठिकाणे

आडगाव नाका, निमाणी बसस्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, रामकुंड परिसर या ठिकाणी हमखास वाहतूककोंडी होते. वाहतूक शाखेने वाहतूक नियंत्रण पायलट प्रोजेक्ट राबवला तर पंचवटीतील वाहतूक समस्या निश्चित सुटेल, असे नागरिकांना वाटते.

- Advertisment -

ताज्या बातम्या