Saturday, November 23, 2024
Homeअग्रलेखकौशल्यप्राप्तीकडे अंगुलीनिर्देश

कौशल्यप्राप्तीकडे अंगुलीनिर्देश

वाढती बेरोजगारी आणि रोजगारासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या कौशल्यांचा युवा पिढीतील अभाव हे चित्र जाणत्यांना अस्वस्थ करणारे आहे. राज्यात ठिकठिकाणी रोजगार मेळावे भरवले जातात. त्या मेळाव्यांना रोजगार इच्छुकांची गर्दी ओसंडून वाहतांना आढळते. त्या प्रमाणात रोजगार प्राप्ती होत नाही अशी तक्रार युवा करतात. तथापि आयोजकांचे व मेळाव्यासाठी येणाऱ्या उद्योगांचे निष्कर्ष सद्यस्थितीचे नेमके वर्णन करणारे ठरू शकतात. कुशल मनुष्यबळाचा अभाव ही उद्योगांची मोठीच अडचण आहे.

रोजगार आहेत पण त्यासाठी आवश्यक असणारे सामान्य कौशल्य देखील अनेक युवांमध्ये अभावाने आढळते. मग त्यासाठीची निपुणता तर फार दूरची गोष्ट आहे असे रोजगार मेळाव्यांमध्ये मुलाखती घेण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. कौश्यल नसतानाही कामाचे तास मोजकेच असावेत, सुट्टी वेळेत व्हावी, पगार जास्त असावा, शक्यतो ऑफिसवर्क असावे, हात काळे करणारे नसावे, शहरात काम मिळाले तर फारच छान या अपेक्षा समस्येची तीव्रता अजूनच वाढवू शकतात. पदवीपर्यंतचे शिक्षण घेता घेता अशी कौशल्ये शिकवली जायला हवीत याकडे अभ्यासक सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न सातत्याने करतात. विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतीच काढलेली मार्गदर्शक सूचना उपायकारक ठरू शकेल. पदवीपूर्व स्तरावरील विद्यार्थ्यांना कार्यप्रशिक्षण (इंटर्नशिप) देण्याबाबत मार्गदर्शक सूचनांचा मसुदा आयोगाने प्रसिद्ध केला आहे.

- Advertisement -

त्यानुसार तीन वर्षे पदवीच्या विद्यार्थ्यांना ६० ते १२० तास, तर चार वर्षे पदवीच्या विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्प पूर्ण करावा लागणार आहे. त्यासाठीची क्षेत्रे, गुण मिळवण्याची पद्धती आणि पात्रता याचा सविस्तर उल्लेख त्यात असल्याचे माध्यमात प्रसिद्ध झालेल्या वृतांत म्हण्टले आहे. व्यापार आणि कृषी क्षेत्र, अर्थव्यवस्था आणि बँकिंग, आर्थिक सेवा, विमा, वाहतूक, माहिती तंत्रज्ञान, हस्तकला, कला, डिझाइन, संगीत, आरोग्यसेवा आणि जीवन विज्ञान, पर्यटन आणि आतिथ्यसेवा, पर्यावरण, वाणिज्य आणि व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांमधून विद्यार्थी त्यांचे मनपसन्त क्षेत्र निवडू शकतील. त्यासाठी उच्च शिक्षण संस्थांना स्थानिक उद्योग, संशोधन संस्थांशी कार्यप्रशिक्षण, संशोधनासाठी सामंजस्य करार करावा लागेल. लाखो विद्यार्थी पर्यंतचे शिक्षण घेतात. त्या सर्वांनाच रोजगाराभिमुख किंवा त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात कौश्यल्य प्राप्तीची संधी मिळू शकत असेल का? उदाहरणार्थ युट्यूब हे अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. त्यातून प्रेरणा घेऊन काहीतरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांची संख्या कमी असेल का? तथापि परिस्थिती आणि संधीअभावी त्यासाठीची पात्रता कमावणे किती जणांना शक्य होऊ शकेल. वर उल्लेखिलेल्या क्षेत्रांसाठी देखील तेच लागू होऊ शकेल. अर्थात, आयोगाने उपरोक्त मार्गदर्शक सूचनांच्या मसुद्यावर हरकती-सूचना मागवल्या आहेत. तशा त्या केल्याही जातील कदाचित. केल्या जायलाही हव्यात. तथापि योग्य ती कार्यवाही होऊन या सूचना अंमलात आणल्या जाव्यात अशीच युवा पिढीची अपेक्षा असेल. कारण युवांना योग्य वयात नोकरीसाठीची कौशल्यप्राप्त करण्याची संधी त्यात दडली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या