अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मुख्यमंत्री माझी बहिण लाडकी योजनेत नगर जिल्ह्यातील पात्र महिलांची संख्या आता दहा लाखांच्या टप्प्यावर पोहचली आहे. जिल्ह्यात या योजनेत 25 ऑगस्टअखरे 9 लाख 97 हजार महिला पात्र ठरल्या असून पहिल्या टप्प्यात 15 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान पात्र ठरलेल्या आणि बँक खाते ओके असणार्या 6 लाख 90 हजार महिलांच्या खात्यावर योजनेचा प्रत्येकी 3 हजार प्रमाणे दोन महिन्यांचे पैसे वर्ग झाल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
दरम्यान, नगर जिल्हा बहिण माझी लाडकी योजनेत राज्यात अव्वलस्थानी असून पुणे, नाशिक आणि नगरमध्ये या योजनेच्या अंमलबजावणीत स्पर्धा आहे. योजनेत जास्तीजास्त अर्ज दाखल करण्यात नगर जिल्ह्यात राज्यात पहिल्या नंबर असून जिल्ह्यातून आतापर्यंत 10 लाख 33 हजार महिलांनी योजनेत अर्ज केले असल्याची माहिती जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाच्यावतीने देण्यात आली. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा झाल्यापासून नगर जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर योजनेच्या अंमलबजावणीसाठी मोठे प्रयत्न करतांना दिसत आहे.
योजनेची धुरा नोडल अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे महिला बालकल्याण अधिकारी मनोज ससे यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. या योजनेत गाव पातळीवर प्रमुख्याने अंगणवाडी सेविकांनी मोठी भूमिका निभावली आहे. यामुळे योजनेत पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यात 7 लाख 8 हजार महिलांचे अर्ज दाखल होवू शकले. दाखल अर्जाची आठ दिवसात स्कुटणी करण्यात येवून 6 लाख 90 हजार महिला योजनेसाठी पात्र ठरल्या. या महिल्यांच्या खात्यावर 15 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान योजनेतील दोन महिन्यांचे तीन हजारांप्रमाणे पैसे वर्ग करण्यात आला आहे.
योजनेत दुसर्या टप्प्यात वेगवेगळ्या कारणामुळे राहिलेल्या 3 लाख 25 हजार महिलांचे अर्ज गेल्या चार ते पाच दिवसात जिल्हा प्रशासनापर्यंत ऑनलाईन आलेले आहेत. आलेल्या अर्जापैकी 2 लाख 85 हजार महिलांचे अर्ज स्कुटणी नव्याने मंजूर करण्यात आलेले आहेत. आधीचे 6 लाख 90 हजार आणि आताचे 2 लाख 85 हजार लाडक्या बहिणीचे अर्ज पात्र ठरल्याने एकट्या नगर जिल्ह्यात आतापर्यंत 9 लाख 75 हजार महिला या योजनेत पात्र ठरलेल्या आहेत. अद्याप 40 हजार अर्जाची स्कुटणी बाकी असून ती आज होण्याची शक्यता आहे. यामुळे नगर जिल्ह्यात 10 लाख लाडक्या बहिणींना सरकारच्या योजनेचा लाभ मिळणार आहे.
दुसर्या टप्प्यात आलेले अर्ज
अकोले 23 हजार 425, संगमनेर 29 हजार 531, कोपरगाव 26 हजार 808, श्रीरामपूर 18 हजार 850, नेवासा 26 हजार 96, शेवगाव 15 हजार 708, पाथर्डी 20 हजार 807, जामखेड 10 हजार 836, कर्जत 16 हजार 934, श्रीगोंदा 24 हजार 521, पारनेर 17 हजार 558, नगर 46 हजार 310, राहुरी 23 हजार 158, राहाता 21 हजार 13 असे 3 लाख 25 हजार अर्जाचा समावेश आहे. यापैकी 2 लाख 85 हजार अर्ज पात्र ठरले आहेत.