मुंबई | Mumbai
लाडकी बहीण अर्ज भरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. त्यामुळे, ज्या महिला भगिनींनी लाडकी बहीण योजनेसाठी अद्याप अर्ज भरले नाहीत, त्या लाडक्या बहिणींना आपले अर्ज भरता येणार आहेत. योजनेचा अर्ज १५ ऑक्टोबरपर्यंत भरता येणार आहे. त्यामुळे आता लाभ न घेतलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी या योजनेत अर्ज करण्याची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत होती. आता १५ ऑक्टोबर २०२४ रात्री बारा वाजेपर्यंत या योजनेत अर्ज करता येणार आहे. मात्र हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकामार्फतच भरावे लागणार आहे.
राज्यातील लाडकी बहीण योजनेला मिळणार उदंड प्रतिसाद पाहून राज्य सरकारकडून या योजनेला मुदतवाढ दिली जात आहे. यापूर्वी ३० सप्टेंबरपर्यंत ह्या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार, गेल्या महिन्यातही लाखो महिलांना आपले अर्ज सादर केले आहेत. ज्या महिलांनी अर्ज सादर केले, त्यांना या योजनेचा लाभही मिळण्यास सुरुवात झाली आहे.
रक्षाबंधन सणाचा मुहूर्त साधत राज्य सरकारने या योजनेच्या पहिल्या हफ्याच्या वितरणास सुरुवात केली होती. तेव्हापासून आजपर्यंत तब्बल २ कोटी ३० लाख महिला या योजनेत पात्र ठरल्या असून त्यांच्या बँक खात्यावर पैसेही जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बहुतांश महिलांच्या बँक खात्यात तब्बल ५ हफ्ते म्हणजे ७५०० रुपये जमा झाले आहेत. आता, उर्वरीत महिलांनाही लाडकी बहीण योजनेसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. मात्र, त्यासाठी केवळ अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अर्ज करता येईल.
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत ग्रामीण भागापासून शहरापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला होता. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. त्यामुळे सरकारने अॅप आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात केली होती. परंतु आता ही मुदतवाढ दिली असून ऑनलाईन पद्धतीने किंवा अॅपने अर्ज करता येणार नाही. आता फक्त अंगणवाडी सेविकामार्फतच अर्ज करावा लागणार आहे.
लाडकी बहीण योजनेचे अर्ज फक्त अंगणवाडी केंद्रात स्वीकारले जात आहेत. या संदर्भातील जीआर देखील सरकारच्या वतीने जारी केलाय. या योजनेची अर्ज भरण्याची मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत करण्यात आली आहे.
या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार?
आधार कार्ड
अधिवात/जन्म प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र
अर्जदाराने हमीपत्र
बँक पासबुक
अर्जदाराचा फोटो
योजनेच्या लाभासाठी या आहेत अटी
अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला अर्ज करु शकतील.
आधी लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष होता. नवीन बदलानुसार तो २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात आले आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा