मुंबई | Mumbai
लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता येण्यास सुरुवात, महिलांनो लगेच चेक करा बँक बॅलन्स!महाराष्ट्र सरकारची अतिमहत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जुलै महिन्यात घोषणा करण्यात आल्यानंतर राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील सुमारे दोन कोटी महिलांना आत्तापर्यंत दरमहा १५०० रुपये देण्यात आले. जुलै ते डिसेंबर असे ९ हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले असून आता जानेवारी महिन्याचा हफ्ता येण्यास सुरुवात झाली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीच यासंदर्भात माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच महिला व बालविकास खात्याकडे ३ हजार ७०० कोटींचा चेक दिल्याची माहिती अजित पवारांनी दिली होती. त्यानुसार २६ जानेवारीपासून पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल, असंही सांगितलं होतं. २४ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून पैसे येण्यास सुरुवात झाली असून पात्र महिलांनी तत्काळ त्यांची आधार कार्डशी लिंक असलेली बँक खाती तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २६ जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
जानेवारी २०२५ महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. २४ जानेवारी २०२५ पर्यंत १.१० कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असून, २६ जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे,असे ट्विट अदिती तटकरे यांनी केले आहे. त्यामुळे आता सातव्या महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी १ कोटी १० लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा निधी जमा झाल्याचे त्यांनी नमूद केले. उद्यापर्यंत (२६ जानेवारी) सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल, असेही त्यांनी नमूद केले.
पैसे जमा झाल्याचे कसे तपासाल?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्यास तुमच्या लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस प्राप्त होईल. अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे एसएमएस प्राप्त होत नाहीत. त्यामुळे अशावेळी संबंधित बँकेच्या अॅपमध्ये जाऊन स्टेटमेंट चेक करावे. जर तुम्हाला अद्यापही पैसे आले नसतील तर २६ जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागेल.