अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्य सरकारकडून नगर जिल्ह्यात 15 दिवसांपूर्वी 1 लाख 25 हजार लाडक्या बहिणींची यादी महिला बालकल्याण विभागाला पाठवून यातील पात्र बहिणीची तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. मात्र, या योजनेतील पात्र-अपात्र महिलांची तपासणी करण्यास अंगणवाडी सेविका संघटनेने नकार दिला आहे. यामुळे जिल्ह्यात काही दिवसांपासून हे काम जवळपास ठप्प असून आतापर्यंत अवघ्या 40 हजार बहिणींचे अर्ज तपासण्यात आलेले आहेत. या कामाला गती मिळावी, म्हणून राज्य सरकारकडून आता अन्य शासकीय यंत्रणांना या मोहिम उतरवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यादृष्टीने चाचपणी करण्यात येत असल्याचे महिला बालकल्याण विभागाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेत 8 ते 10 महिन्यांचा लाभ दिल्यानंतर आता राज्य सरकारकडून पात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींची नव्याने पडताळणी करण्यात येत आहे. नगर जिल्ह्यात 11 लाख 50 हजारांहून अधिक महिल या योजनेत पात्र करण्यात आल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वी यातील चारचाकी वाहन नावावर असणार्या 22 हजार महिलांची यादी सरकार पातळीवरून महिला बालकल्याण विभागामार्फत नगरच्या प्रादेशिक परिवहन विभागाला सादर करण्यात आलेली आहे. या यादीतील किती बहिणी अपात्र आहेत, याबाबत गोपनियता ठेवण्यात येत असतांना 15 दिवसांपूर्वी पुन्हा 1 हजार 25 हजार महिलांची दुसरी यादी महिला बालकल्याण विभागाला पाठवण्यात आली.
या यादीनुसार एकाच कुटूंबातील दोन किंवा त्यापेक्षा अधिक लाभार्थी असणार्या लाडक्या बहिणीची प्रत्यक्षात अथवा फोन करून पडताळणी करण्याचे तोंडी आदेश अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले आहेत. मात्र, योजनेतील पात्र महिलांची नावे कमी करतांना संबंधीत गावात अंगणवाडी सेविका व लाडक्या बहिण योजनेतील महिला यांच्यात वाद होण्याची शक्यता असल्याने याकामास अंगणवाडी सेविका कर्मचारी युनियनच्यावतीने या कामास नकार दर्शवला आहे. या शिवाय अंगणवाडी सेविकांचे पोषण आहारचे मुख्य काम बंद पडणार असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे.
यामुळे नगर जिल्ह्यात गेल्या 15 दिवसात 1 लाख 25 हजार संशयीत लाडक्या बहिणींपैकी अवघ्या 40 हजार महिलांची पडताळणी होवू शकलेली आहे. या पुढे अंगणवाडी सेविकांनी हे काम करण्यास नकार दिल्यास राज्य सरकार अन्य शासकीय यंत्रणांकडे हे काम सोपावून लाडक्या बहिणींची पडताळणी करणार आहे. त्यादृष्टीने सरकारकडून महिला बालकल्याण विभागात चाचपणी करण्याच्या सुचना देण्यात आल्याचे सुंत्राकडून सांगण्यात आले.
लाडक्या बहिणींना लवकरच गिफ्ट
लाडक्या बहिणींना दर महिन्याच्या अखेरीस किंवा सणासुदीच्या मुहूर्तावर हप्त्याचे वितरण केले जाते. त्यामुळे आता गणेशोत्सवात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर किंवा गौरी आगमनाच्या दिवशी ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन्ही महिन्यांचा एकत्रित 3000 रुपयांचा हप्ता दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र, या संदर्भात राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.





