अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
लाडकी बहीण योजनेचे फायदे योग्य आणि पात्र महिलांपर्यंत पोहोचावेत यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अनेक लाभार्थी महिलांना तांत्रिक अडचणींमुळे किंवा माहितीच्या अभावामुळे अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने ई-केवायसीसाठीची मुदत आता 31 जानेवारी 2026 पर्यंत वाढवली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने आता कठोर पावले उचलली आहेत. या योजनेत काही ठिकाणी बोगस लाभार्थी घुसल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी बंधनकारक केले आहे. या प्रक्रियेद्वारे पात्र महिलांची पडताळणी केली जाणार असून, ज्या महिलांचे ई-केवायसी अपूर्ण असेल, त्यांचा लाभ रोखला जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात, माझी लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांना 3 आणि 4 नोव्हेंबर रोजी त्यांचा ऑक्टोबरचा हप्ता 1,500 देण्यात आला. नोव्हेंबरचा हप्ता अद्याप मिळालेला नाही आणि डिसेंबर महिना संपत आला आहे. परिणामी, महिला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात व्यस्त आहेत, तर नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यांची वाट पाहत आहेत. नवीन वर्ष सुरू होताच महाराष्ट्र सरकार लाडक्या बहीणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. 2026 मध्ये मकर संक्रातीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण तीन हप्ते म्हणजेच 4500 रुपये बँक खात्यात जमा होणार आहेत. तीन महिन्यांपैकी त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर व जानेवारीचे दोन हप्ते 3000 रुपये देण्याचेही नियोजन सरकार करत असल्याचे सांगितले जात आहे.




