अहिल्यानगर (प्रतिनिधी)
सरकारने २०२२ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानंतर नगर जिल्ह्यात बचत गट चळवळीत काम करणाऱ्या सुमारे दीड लाख महिलांचे वार्षिक उत्पन्न हे १ लाखांपेक्षा कमी होते. त्यावर विविध उपाययोजना आणि या महिलांचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केल्याने, त्यांना आर्थिक पतपुरवठा केल्याने तिसऱ्या टप्पाअखेर केलेल्या सर्वेक्षणात नगर जिल्ह्यातील ७२ हजार ३०० महिला लखपती दीदी झाल्याचे समोर आले.
बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळाले आहे. मात्र, यानंतर देखील बचत गटात काम करणाऱ्या महिलांचे उत्पन्न हे १ लाखांपेक्षा कमी असल्याचे २०२२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात समोर आले होते. नगर जिल्ह्यात अशा १ लाख ५० हजार महिला होत्या. या महिलांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध पर्यायासह त्यांना आर्थिक पतपुरवठा करण्यात आला.
नगर जिल्ह्यात अशा प्रकारे तीन वर्षात १ हजार कोटींचे कर्ज देण्यात आले आहे. त्यानंतर प्रत्येक गावनिहाय आणि बचत गटनिहाय केलेल्या निरिक्षणात आणि संकलित करण्यात आलेल्या आकडेवारीत नगर जिल्ह्यात ७२ हजार ३०० महिलांचे उत्पन्न हे एक लाखांपेक्षा अधिक झालेल्याचे समोर आले. यासाठी दर तीन महिन्यांनी माहिती घेण्यात येत आहे. आता पुढील टप्प्यातील लखपती दीदींची आकडेवारी मार्चअखेर समोर येणार आहे. यात जिल्ह्यात जवळपास ७९ हजार महिला लखपती करण्याचे उद्दिष्टे ठेवण्यात आले असल्याचे उमेद विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात १ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या २ लाख १८ हजारावर महिला आढळल्या तर १ लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या महिलांची संख्या १ लाख ८२ हजार होती. सरकारने १ लाख उत्पन्न असणाऱ्या महिलांवन लक्ष केंद्रीत करत त्यांना पतपुरवठा करून त्यांचे वार्षिक उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केल्याने जिल्ह्यातील ७२ हजार ३०० महिला लखपती दीदी ठरले आहे. यासाठी २०२४-२५ साठी जिल्ह्याला ७९ हजार ३५७ महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
यंदा २४६ कोटींचे कर्ज वितरण
जिल्ह्यातील बचत गटांना मागीलवर्षी ३४९ कोटी रुपयांचे तर यंदा सन २०२४-२५ साठी २४६ कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले. या व्यतिरिक्त अभियान अंतर्गत दोन वर्षात ६० कोटी ६९ लाख रुपयांचे फिरते भांडवलही व्यवसायासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
२७ हजार बचत गट
जिल्ह्यात २७ हजार ३५५ महिला बचत गट सक्रिय आहेत. त्या माध्यमातून ३ लाख १२ हजार महिला जोडल्या आहेत. गेल्या तीन वर्षात अहिल्यानगर जिल्ह्यात १ हजार कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. ही आकडेवारी बँकांकडील असून त्याआधारे महिला बचत गटाच्या कामाच्या आलेखावर निरीक्षण करण्यात येत आहे.