Friday, September 20, 2024
Homeनगरलखपती दीदी योजनेत 79 हजार बचतगट महिलांची निवड

लखपती दीदी योजनेत 79 हजार बचतगट महिलांची निवड

प्रशासनाने एकत्रित कृती संगमातून प्रयत्न करण्याच्या सूचना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

लखपती दीदी योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील 79 हजार 357 महिलांची निवड करण्यात आली आहे. सर्व विभागांच्या एकत्रित कृती संगमातून शासकीय योजनांचा लाभ देत उमेद अभियानांतर्गत महिलांना लखपती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लखपती दीदी कार्यक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कौशल्य व रोजगार विभागाचे सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये महिला बचत गटांचे जाळे निर्माण झाले आहे. अभियानाच्या माध्यमातून महिला बचत गटातील महिलांना उपजीविका विषयक माहिती देऊन महिलांचे उत्पन्न वाढविण्यासाठी काम केले जात आहे. या योजनेचाच एक भाग म्हणून शासनाच्या बचत गटांच्या महिलांना लखपती बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. लखपती दीदी योजनेमध्ये महिलांची निवड करून प्राधान्याने विविध विभागाचे लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

लखपती दीदी योजनेंतर्गत स्वयंसहाय्यता समुहात सहभागी महिलांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांचे आर्थिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक करण्यासाठीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी एकत्रितपणे व समन्वयातून या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अधिक प्रमाणात प्रयत्न करावेत. कमी पाण्यामध्ये शाश्वत उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून रेशीम शेतीकडे पाहिले जाते. ज्या महिलांकडे शेती उपलब्ध आहे, अशा महिलांना रेशीम शेती करण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात यावेत. उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप यांनी सदारीकरणाद्वारे योजनेच्या प्रगतीची माहिती दिली.

अकोले तालुक्यामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तालुक्यातील पर्यटन वाढीच्यादृष्टीने पर्यटकांना सर्व सोयी-सुविधा सहजरित्या उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावेत. याठिकाणी येणार्‍या पर्यटकांना निवासाची व्यवस्था, परिसरातील प्रसिद्ध खाद्य, बोटींग यासारख्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्याचबरोबर पर्यटकांना परिसर फिरण्यासाठी ई-वाहनांचा वापर करण्यासाठी पुढाकार घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी केल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या