मुंबई | Mumbai
मुंबईच्या गणेशोत्सवातील सर्वाधिक भावनिक आणि भव्य सोहळ्यांपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीने यंदाही भक्ती, उत्साह आणि गर्दीचे सर्व विक्रम मोडल्याचे चित्र आहे. शुक्रवारी दुपारी सुरू झालेली राजाची विसर्जन मिरवणूक रात्रभर मुंबईच्या विविध भागांतून मार्गक्रमण करत शनिवारी सकाळी गिरगाव चौपाटी परिसरात दाखल झाली. बाप्पाला अंतिम निरोप देण्यासाठी चौपाटी परिसरात गणेशभक्तांचा मोठा जनसागर उसळला.
मुंबई आणि पुण्यात अद्यापही गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. लाडक्या गणरायाला निरोप देताना अनेकजण भावूक होताना पाहायला मिळत आहेत. मुंबईतील गणेश विसर्जन सोहळा हा देशभरातील भाविकांसाठी लक्षणीय सोहळा असतो. मुंबईचा राजा, परळचा महाराजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, लालबागचा राजा या गणपतींचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन होत असतं. या गणपती बाप्पांच्या विसर्जन सोहळ्याची जंगी मिरवणूक निघते. यावर्षी मुंबईत दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी (२६ सप्टेंबर) सकाळपर्यंतही विसर्जन मिरवणुका सुरूच आहे.
तब्बल रात्रभर सुरू होती मिरवणूक
अनंत चतुर्दशीच्या दिवशी लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली. लालबाग मार्केटपासून निघालेली ही मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भारतमाता सिनेमा, चिंचपोकळी, भायखळा, खडा पारसी, दोन टाकी, कुंभारवाडा, सुतार गल्ली, माधवबाग, व्ही.पी. रोड आणि प्रार्थना समाज मार्गे गिरगाव चौपाटीकडे रवाना झाली.
प्रत्येक मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. अनेकांनी इमारतींच्या गच्च्यांवरून आणि घरांच्या खिडक्यांमधून लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण दक्षिण मुंबई दुमदुमून गेली.
देशदूतच्या फेसबुक पेजला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
गिरगाव चौपाटीवर भक्तांचा महासागर
शनिवारी सकाळी लालबागचा राजा गिरगाव चौपाटी परिसरात पोहोचल्यानंतर बाप्पाच्या अंतिम दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. चौपाटी परिसरात पोलिसांकडून चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून, भाविकांना शिस्तीत दर्शन घेता यावे यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
बाप्पा चौपाटीवर दाखल होताच भाविकांनी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष केला. अनेक भाविक भावूक झाले असून, बाप्पाला निरोप देताना डोळ्यांत अश्रू आणि मनात पुढील वर्षीच्या आगमनाची आस असे चित्र पाहायला मिळाले.
लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवरील विसर्जनस्थळी दाखल झाल्यानंतर शनिवार, २६ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ८ वाजता विसर्जन सुरू होण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तब्बल २२ ते २३ तासांच्या भव्य मिरवणुकीनंतर लालबागचा राजा गिरगांवच्या समुद्रकिनारी दाखल झाला. स्थानिक कोळी बांधवांच्या मदतीने लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आले. मंडळाच्या माहितीनुसार, मूर्तीला विशेष तराफ्यावरून अरबी समुद्रात नेऊन पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले.




