श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तालुक्यातील नायगाव येथील वाळूपट्टा परिसरात जमीन खरेदीच्या व्यवहारावरून वाद उफाळून येत, सशस्त्र टोळक्याने केलेल्या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला. तर या घटनेत बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह काल पोलिसांना मिळून आला असल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, काल रात्री उशीरा निलेश शेंडगे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रकरणी चेतन पेत्रस खाजेकर (वय 23, डिजे ऑपरेटर, रा. बेलापूर रोड वॉर्ड नं. 07 श्रीरामपूर) या तरुणाने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, चंद्रशेखर मनोज आगे यांच्याशी माझी ओळख असून, नायगाव येथील त्यांच्या नातेवाईकांची जमीन विक्रीला असल्याने ती नेवासा येथील माझे मामा निलेश एकनाथ शेंडगे यांचा शिर्डी येथील मित्र निलेश दीपक जाधव यांना घ्यायची होती. त्यामुळे दि. 25 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मी, अमित परशुराम कुटे (रा. शिर्डी, ता. राहाता), मामा निलेश एकनाथ शेंडगे (रा. नेवासा), चंद्रशेखर उर्फ चंदू आगे असे आम्ही नायगाव येथे जमीन पाहण्यासाठी गेलो होतो.
जमीन पाहुन झाल्यानंतर चंदू आगे त्याठिकाणावरुन निघून गेले. त्यानंतर आम्ही सदर ठिकाणीवरुन निघून जात असताना, तेथे तीन ते चार अनोळखी इसमांनी येऊन निलेश जाधव यांना येथे जमीन घेवू नका, असे म्हणून आम्हाला शिवीगाळ केली. येथून निघून जा, असे म्हणत तेथून काढुन दिले. त्यावेळी निलेश जाधव यांनी चंदू आगे यांना सदर घटनेबाबत फोन करुन सांगितले, त्यांनी निलेश जाधव यांना तुम्ही त्यांचे मनावर घेऊ नका, आपण पुढील महिन्यात भेटु असे सांगितले.
नंतर दि. 11 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता मी चंद्रशेखर आगे यांच्या बेलापूर रोडवरील कार्यालयात गेलो असता, चंद्रशेखर आगे यांनी सांगितले की, निलेश जाधव हे शिर्डी येथून जमीन खरेदीच्या व्यवहारासाठी नायगाव येथे येणार आहेत. तू पुढे जा, मी पाठीमागून येतो. त्यावर मी, निलेश दीपक जाधव त्यांच्यासोबत अमित परशुराम कुटे डिझायर गाडी (नं. एमएच 20 एफ वाय 6022) हिने नायगाव येथे आलो. त्यानंतर मामा निलेश शेंडगे व त्यांच्यासोबत शंकर उमाप असे क्रेटा गाडी (नं. एमएच 17 डीसी 8883) मध्ये त्याठिकाणी पोहोचले. त्याठिकाणी अर्जुन दाभाडे, राहुल धुमाळ, सागर भोसले, विजु पवार, असिफ कैची, अकील बिल्डर, मयुर शिर्के, राहुल चव्हाण, मेजर राणा व इतर 05 ते 06 इसम काळ्या रंगाच्या फाँर्चुनर, स्कॉर्पिओ व ग्रे कलरची इरटिगा मधून आले. अर्जुन दाभाडे हा निलेश जाधव यांस म्हणाला की, इथे जमीन घ्यायची नाही, असे म्हणून त्याच्याकडील गावठी कट्टा त्याने निलेश जाधव यांच्या दिशेने रोखला.
तसेच सागर भोसले व राहुल धुमाळ यांनी लाकडी दांडक्याने व विजू पवार, अकील बिल्डर व आसिफ कैची यांनी लाथाबुक्क्यांनी अमित कुटे व शंकर उमाप यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर निलेश जाधव यास वाचविण्यासाठी निलेश शेंडगे हा मध्ये गेला असता, त्यास अर्जुन दाभाडे याने लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यांनतर मेजर राणा याने गावठी कट्ट्याने माझ्या उजव्या डोळ्याजवळ मारून माझ्या गळ्यातील 7 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरीने हिसकावून घेतली. मयुर शिर्के, राहुल चव्हाण यांनी मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आम्ही घाबरून तेथुन पळुन गेलो. परंतू, मामा निलेश शेंडगे हा नंतर आम्हाला मिळुन आला नाही.
याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अर्जुन दाभाडे (गोंधवणी), सागर भोसले, राहुल धुमाळ, मेजर राणा, विजु पवार, अकिल बिल्डर, मयुर शिर्के, राहुल चव्हाण, असिफ कैची आदींसह पाच ते सहा अनोळखी इसमांविरुध्द भारतीय न्याय संहिता 351(3), 351(2), 352, 115(2), 119(1), 118(1), 191(3), 191(2), 190, 189(2), 189(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना घडल्यानंतर निलेश शेंडगे हा तरुण बेपत्ता झाला होता. काल सदर तरुणाचा मृतदेह गोदावरी नदीपात्रात मिळून आला. पोलीस प्रशासनाने सदर मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा पंचनामा केला. निलेश शेंडगे यांचा मृतदेह प्रवरा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.





