Wednesday, July 24, 2024
Homeनगरगायरान जमिनीच्या वादातून महिलेला मारहाण

गायरान जमिनीच्या वादातून महिलेला मारहाण

मुलीला दिली दुचाकीची धडक || तिघांविरूध्द गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नगर तालुक्यातील देऊळगाव सिध्दी शिवारात गायरान जमीन कसण्यावरून महिलेला मारहाण केली तर तिच्या मुलीला दुचाकीची धडक देऊन जखमी केले. सवित्रा रमेश काळे व तिची मुलगी दिपाली रमेश काळे (रा. देऊळगाव सिध्दी) या जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी सवित्रा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीमंत्या जीवलाल चव्हाण, आदेश केरू काळे, विनोद श्रीमंत्या चव्हाण (सर्व रा. देऊळगाव सिध्दी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सदरची घटना 3 जुलै रोजी दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान घडली असून सोमवारी (8 जुलै) रात्री उशिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 3 जुलै रोजी दुपारी फिर्यादी गायरान जमिनीत मशागत करून पेरणी करत असताना श्रीमंत्या तलवार घेऊन तेथे आला. त्याने फिर्यादीला जमिनीत पेरणी करण्यास विरोध केला. त्यावेळी फिर्यादीने ही जमीन सरकारची गायरान जमीन आहे.

आम्हाला उपजिवीकेचे साधन नसल्याने आम्ही या जमिनीत पेरणी करत आहोत, असे सांगितले. तरीही त्याने फिर्यादीला तलवारीने मारून जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या तीन मुलींना मारहाण केली. फिर्यादी व त्यांच्या मुली मिठू जाधव यांच्या घरासमोरून जात असताना आदेश व विनोद दुचाकीवरून आले व त्यांनी मुलगी दिपाली हिला दुचाकीची धडक देऊन जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अंमलदार माने अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या