श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी|Shrigonda
श्रीगोंदा तालुक्यातील नगर-दौंड महामार्गालगत भिमानदीच्या जवळ निमगावखलू हद्दीत दालमिया भारत ग्रीन व्हिजन लिमिटेड सिमेंट कंपनीसाठी या भागातील शेतकर्यांची आतापर्यंत सुमारे 39 एकर जमीन मध्यस्थामार्फत फसवून खरेदी केल्याने शेतकरी आता आक्रमक होताना दिसत आहेत. यात मध्यस्थाने बागायती जमिनी कंपनीच्या घशात घालून कोट्यवधी रुपयांचे घबाड कमावले असून आणखी जमीन खरेदीसाठी वेगवेगळी प्रलोभने दिली जात असल्याचा आरोप शेतकरी आंदोलकांनी केला आहे.
तालुक्यातील निमगावखलू हद्दीत दालमियाचा एक हजार कोटीचा सिमेंट तयार करण्याचा प्रकल्प उभा करण्यासाठी कंपनीला एकूण 83 एकर जमीन आवश्यक आहे. यासाठी कंपनीच्यावतीने गट नंबर 262 ते 274 या गटातील 39 एकर भागायत जमीन दलालामार्फत कंपनीने खरेदी केली आहे. परंतु हिच जमीन खरेदी करताना या भागातील जमिनीवर रेल्वेचा मालधक्का व स्लिपर कंपनी होणार आहे, असे सांगून भोवतालच्या शेतकर्यांना येथे रोजगार मिळेल, या हेतूने शेतकर्यांनी जमिनी दिल्या. परंतु आता याच जागेवर तामिळनाडू येथील दालमिया नावाची राज्यात सर्वात मोठी सिमेंट कंपनी होणार असून त्याचा त्रास येथील शेतकर्यांच्या शेती पिकावर होणार आहे. यातून सुजलाम्-सुफलाम् असलेला ग्रीन झोन म्हणजे या भागातील बागायत जमीन नापीक होऊन शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. यामुळे येथील शेतकर्यांनी दालमिया कंपनीला विरोध केला आहे.
दरम्यान, या आधी ज्या जमिनी फसवून खरेदी केल्या त्या पुन्हा शेतकरी परत मागत आहेत. आम्हाला तुमचा नुकसान करणारा प्रकल्प नको. तुमच्या प्रकल्पामुळे शेतकर्यांच्या प्रपंचाचे कधीही भरुन न येणारे नुकसान होणार आहे. त्यामुळे वेळ गेलेली नाही. दालमिया सिमेंट मानगुटीवर बसवू नका. यासाठी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी शेतकरी हितासाठी एकत्र यावे, अन्यथा मोठे आंदोलन उभारू, असा आक्रमक पवित्रा येथील असंख्य शेतकर्यांनी घेतला आहे.
जमिनीसाठी विविध प्रलोभने
दालमिया सिमेंट कंपनीत स्थानिक तरुणांना नोकरी मिळेल. तसेच तुम्ही जेसीबी, पोकलेन, हायव्हा, ट्रॅक्टर, ट्रक घ्या तुमची वाहने मी कंपनीत लावतो. तुम्हाला हॉटेल टाकून देतो. मोठा रोजगार मिळेल, अशी खोटी आश्वासने देऊन दलालामार्फत स्थानिक शेतकर्यांना आमिष दाखवून फसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, आता शेतकर्यांचे डोळे उघडले आहेत. ते भूलथापांना बळी पडणार नाहीत, असे निमगाव खलूचे माजी सरपंच भगवानराव चितळकर यांनी सांगितले.