अकोले |प्रतिनिधी| Akole
अनुसूचित जमाती क्षेत्रातील जमिनींचे बेकायदेशीर होत असलेले संक्रमण लक्षात घेता अकोले तालुक्यातील बारी व जहागिरदारवाडी येथे ग्रामसभा होऊन एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र अधिनियम 1997 अन्वये अनुसूचित जमातीच्या ज्या जमिनी बेकायदेशीर अन्यसंक्रमित करण्यात आल्या आहेत, अशा जमिनी परत मिळून देण्यास ग्रामपंचायतने जिल्हाधिकार्यांकडे शिफारस करावी असा ठराव करण्यात आला. तसेच नवीन जमीन खरेदी-विक्री या ग्रामसभेच्या परवानगीशिवाय करू नयेत असाही ठराव करण्यात आला.
सध्या पावसाळा सुरू असल्याने कळसूबाई शिखराचे सौंदर्य पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येत आहेत. त्यातच काही हौशी पर्यटक सुद्धा येत आहेत. कळसूबाई शिखराची चढाई करणे म्हणजे निसर्गाचा आनंद, पक्षांचा चिवचिवाट तसेच स्थानिकांनी राखून ठेवलेल्या झाडे-झुडूपे, डोंगरावरून वाहणारे असंख्य झरे पाहता येतात. परंतु या गोष्टींचे काही पर्यटक भान ठेवताना दिसत नाही. त्यासाठी कळसूबाई किंवा सह्याद्रीत कोठेही फिरताना एक नियमावली असावी. चढाईला जाताना जोरजोरात ओरडणे, स्पीकर वाजवणे, शिखरावर जाऊन नाचगाणे करणे, अनपेक्षित रील्स बनवणे, मद्यपान-धूम्रपान करणे, शिखरावर कचरा करणे अशा गोष्टींना आळा बसण्यासाठी आता प्रत्येक पर्यटक व त्यांच्या गाडीची तपासणी केली जाणार आहे. सोबतच प्रवेश शुल्क म्हणून प्रतिव्यक्ती 30 रुपये असे शुल्क आकारणी गावातील समितीद्वारे करावी, असा एकमताने ठराव करण्यात आला.
कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी बारी व जहागिरदारवाडी ही गावे असल्याने व जमिनी तुटपुंज्या असल्याने जमिनींबाबतचा असा ठराव करण्यात आला.
– वैशाली खाडे (सरपंच-बारी)
कळसूबाई शिखरावर जाणार्या प्रत्येक पर्यटक व भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रवेश करताना आवश्यक ते ओळखपत्र तपासून व नोंदणी करून प्रवेश दिल्यास शिखरावर घडणार्या अनुचित प्रकारांना पूर्णतः आळा बसेल. तसेच नियम पालन करणार्या पर्यटकांना यातून दिलासा मिळेल. एक चांगल्या पर्यटनाच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
– पंढरीनाथ खाडे, जहागिरदारवाडी, सरपंच