Saturday, July 27, 2024
Homeनगरजमिनीची विक्री होऊ देण्यासाठी मागितली 25 लाखाची खंडणी

जमिनीची विक्री होऊ देण्यासाठी मागितली 25 लाखाची खंडणी

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

जमीन विक्री होऊ देण्यासाठी रुपये 25 लाख रुपये खंडणीची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात तालुक्यातील सौंदाळा येथील स्वप्निल ज्ञानदेव गरड यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक काकासाहेब आबासाहेब शिंदे (वय 68) रा. सुरेगाव, ता. नेवासा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, माझ्या भेंडा बुद्रुक शिवारात तीन मिळकती आहेत. माझे मिळकती शेजारी स्वप्निल ज्ञानदेव गरड यांची मिळकत आहे. स्वप्निल ज्ञानदेव गरड याचा माझ्या मिळकतीशी कुठलाही संबंध नाही. स्वप्नील ज्ञानदेव गरड हा निष्कारण मला त्रास देण्यासाठी माझे मिळतीचे गट नंबर 255 उतार्‍याच्या इतर हक्कात असलेले पोकळीस्त नावाच्या आधारे मला ब्लॅकमेल करण्याचा व माझे चारित्र्यहनन तसेच बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहे.

स्वप्निल गरड याने दि. 25 जून रोजी माझी बदनामी व्हावी तसेच माझे आर्थिक नुकसान व्हावे या उद्देशाने व्हॉट्सअ‍ॅपवर असलेल्या एका कृषी मार्केट ग्रुपवर माझी शेतजमीन मिळकत गट नंबर 254/2, 255 आणि 256 ही विकावयास असल्याने व हे त्यास माहीत असल्याने खोट्या प्रकारचा मेसेज मौजे भेंडा बुद्रुक, ता. नेवासा येथील गट क्रमांक 254/2 आणि 255 मधील शेतजमीन विक्रीला असून सदर शेतजमीन ही वादातील आहे. तसेच इतर अनेक उणीवा असलेली शेतजमीन आहे. तरी सदरील शेतजमीन कुणीही विकत घेऊ नये, तुमची फसवणूक होऊ शकते. सदरची जमीन वादातील असल्यामुळे मूळ मालकाने विक्रीस काढली आहे असा खोटा मेसेज प्रसारित केला.

त्यानंतर मी स्वप्निल गरड यांची भेट घेतली. त्यावेळी त्याने मला सांगितले की, तुमची जमीन विकायची असेल तर तुम्ही मला 25 लाख रुपये दिले तरच मी माघार घेणार आहे, नाहीतर मी तुमची बदनामी करीन. तुम्हाला जिवंत राहू देणार नाही व जमीनही विकू देणार नाही.

त्यानंतर 26 जून रोजी देखील अशीच बदनामीकारक पोस्ट टाकली. माझी आर्थिक, सामाजिक, राजकीय बदनामी व नुकसान करीत आहे. तसेच माझ्या शेतात येऊन मला व माझ्या मुलास व गड्यांना शिवीगाळ करत आहे म्हणून माझी त्याच्याविरुद्ध तक्रार आहे.

या फिर्यादिवरुन नेवासा पोलीस ठाण्यात स्वप्निल ज्ञानदेव गरड याच्याविरुद्ध भादंवी कलम 385, 500, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या