Monday, June 24, 2024
Homeनाशिकडाळींचे भाव गगनाला भिडले, 'असे' आहेत दर

डाळींचे भाव गगनाला भिडले, ‘असे’ आहेत दर

नाशिक । सारिका पूरकर-गुजराथी Nashik

- Advertisement -

राज्यातील बर्‍याच शहर व जिल्ह्याला पावसाने दिलेली हुलकावणी नाशिककरांना चांगलीच महागात पडत आहे. अन्न व धान्याच्या किमती त्यामुळे वाढल्या असून, महिनाभराच्या किराण्याचेे बजेट कोलमडत चालले आहे. किराणा खर्चाचे हे गणित जुळवता-जुळवता सर्वसामान्यांंच्या नाकीनऊ आले आहे. सप्टेेंबर अर्धा उलटत आला तरी समाधानकारक पाऊस न पडल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. परिणामी नाशिकमध्ये अन्नधान्याची आवक घटली आहे. येत्या काही दिवसांत जर पुरेसा व आवश्यक पाऊस झाला नाही तर अन्नधान्याच्या बाबतीत परिस्थिती आणखीनच चिंताजनक होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

नाशिकसह राज्यात बर्‍याच ठिकाणी यावर्षी पुरेसा पाऊस न पडल्याने पिके करपली आहेत. अजूनही समाधानकारक पाऊस पडत नाहीये. भातासह अन्य खरीप पिकांना आवश्यक पाऊस मिळत नसल्याने ती जवळपास हातातून गेली आहेत. त्यामुळेच तूरडाळीबरोबर अन्य डाळींची आवक खूप कमी झाली आहे. म्हणनूच डाळींच्या भावात वाढ झाली आहे.

तूरडाळ चक्क 200 रुपये किलोच्या घरात पोहोचली आहे. दररोजच्या जेवणाच्या ताटातील वरण-भात त्यामुळे परवडेनासा झाला आहे. कारण नुसतीच डाळ नाही तर जोडीला चांगल्या प्रतीचा तांदूळही प्रचंड महागला आहे. चांगला मऊसूत, दाणेदार भातासाठी चांगल्या प्रतीच्या तांदळाची निवड चोखंदळ गृहिणी करत असतात. परंतु बासमतीसारखा तांंदुळ देखील आता 200 रुपये किलोच्या घरात पोहोचला आहे. बासमतीनंतर दूधमलाई, इंद्रायणी, वाडा कोलम, सूरती कोलम, जिरा राईस, कालीमुंछ हे चांगल्या प्रतीचे तांदुळ देखील प्रचंड महागले आहेत.

बाजरीची भाकरी हे खरे तर आपल्याकडे गरिबाचे खाणे म्हणूनच माहित आहे. त्यामुळे बाजरीच्या किंमती या नेहमीच अन्य धान्याच्या तुलनेत कमीच असतात. परंतु, आता बाजरीने देखील चाळीशी पार केली आहे. बाजरीच्या जोडीला ज्वारीला देखील सोन्याचा भाव आला आहे. मधुमेह चिकित्सेत ज्वारीला महत्त्व वाढल्यापासून ज्वारीला सुगीचे दिवस आले आहेत. किंबहुना गव्हापेक्षा ज्वारी भाव खाऊ लागली आहे.

पाऊस न पडल्यास परिस्थिती चिघळेल

नाशकात विदर्भातून, तसेच जालना, सोलापूर या भागातून ज्वारी, तूरडाळ, मुगडाळीची आवक होत असते. या भागात पावसाअभावी पिकांची अवस्था अत्यंत वाईट आहे म्हणूनच तूरडाळीचे भाव वाढले आहेत. तांदूळ व गव्हाच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. गव्हाची आवक ही मध्य प्रदेशातून जास्त होते. मात्र तिथेही जो पाऊस पडला तो पिकांसाठी नुकसानकारक ठरला, त्यामुळे गव्हाचे दरही कडाडले आहेत.

शिवाय पंजाबमध्ये जो गहू पिकतो, त्याची पोळी लाल येत असल्यामुळे आपल्याकडे तो खरेदी केला जात नाही. मध्य प्रदेशावरच गव्हासाठी अवलंंबून राहावे लागते. एकंदरीतच यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतीला, बळीराजाला व पर्यायाने धान्य बाजाराला बसला आहे. सर्वच अन्नधान्याची आवक अत्यंत कमी झाली आहे. येत्या काही दिवसात पुरेसा पाऊस होऊन दुबार पेरण्यांची पिके हाती आली तरच काहीसे चित्र बदलेल. अन्यथा, यापेक्षाही किंमती वाढल्या तर नवल नको.

– राहुल डागा, संचालक, नाशिक धान्य घाऊक व्यापारी संघटना

केंद्राचा साठेबाजांना इशारा

केंद्र सरकारने मसूर डाळीच्या अनिवार्य साठ्याबाबत तत्काळ प्रभावाने माहिती देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सर्व संबंधितांनी दर शुक्रवारी विभागाद्वारे व्यवस्थापित स्टॉक डिस्क्लोजर पोर्टलवर त्यांच्याकडील मसूर डाळीची माहिती अनिवार्यपणे उघड करावी. कोणताही अघोषित साठा आढळल्यास तो साठेबाजी मानला जाईल. त्यानुसार आवश्यक वस्तू कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे.

ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी साप्ताहिक मूल्य आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. मसुर डाळीची बफर खरेदी अधिक व्यापक बनवण्याच्या सूचना देखील यावेळी रोहित कुमार सिंह यांनी दिल्या आहेत. किमान हमी भावाच्या जवळच्या किंमतीत उपलब्ध साठा खरेदी करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. जेव्हा कॅनडामधून मसूर डाळीची आयात आणि आफ्रिकन देशांमधून तूर डाळीची आयात वाढत असताना काही प्रमुख कंपन्या, ग्राहक राष्ट्राच्या हिताच्या विरोधात बाजारपेठेत अनियमितता आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे सिंह म्हणाले. मात्र, सरकार या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे सिंह यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या