Friday, April 11, 2025
Homeब्रेकिंग न्यूजलासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती पदाची निवड बिनविरोध

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती पदाची निवड बिनविरोध

लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी ज्ञानेश्वर किसन जगताप यांची तर उपसभापतिपदी संदीप दरेकर यांची बिनविरोध निवड झाल्याने तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात या निवडीकडे लक्ष लागून असलेल्या राजकीय निरिक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

- Advertisement -

अत्यंत अनिश्चिततेकडे वाटचाल करणार्‍या सभापती, उपसभापति निवडीसाठी अनेक इच्छुक उमेद्वार असतांना सदर सभापती निवड ही बिनविरोध होईल, याची कुठलीही शक्यता नसतांना मतदारसंघाचे बाहुबली तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या धक्कातंत्राने सदस्य मंडळाने निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पाडली. लासलगाव बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात प्राधिकृत अधिकारी तथा सहायक निबंधक सहकारी संस्था निफाड कांतीलाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दोन्ही गटाचे सर्व 17 सदस्य उपस्थित होते.

सभापती पदासाठी (डी.के.) ज्ञानेश्वर जगताप यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. उपसभापती पदासाठी संदीप दरेकर व राजेंद्र बोरगुडे यांचे दोन अर्ज दाखल झाले. मात्र भुजबळ यांचे सूचनेनुसार दिलीप खैरे यांनी दोन्ही गटातील प्रमुख जयदत्त होळकर व पंढरीनाथ थोरे यांच्या सदस्य मंडळाशी चर्चा केली. त्यानंतर राजेंद्र बोरगुडे यांनी माघार घेतल्याने दरेकर यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते सभापती बाळासाहेब क्षीरसागर, मावळते उपसभापती गणेश डोमाडे यांनी तर भुजबळांचे प्रतिनिधी दिलीप खैरे यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा सत्कार केला.


ज्येष्ठ संचालक राजेंद्र डोखळे, पंढरीनाथ थोरे, जयदत्त होळकर यांनी लासलगाव बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांनी अधिकाधिक वेळ देवून शेतकरीहिताचे निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करावे. यासाठी सर्व संचालक मंडळ सहकार्य करेल, असे आश्वासन यावेळी समस्त संचालक मंडळाच्या वतीने दिले. क्षीरसागर यांनी जगताप यांना शुभेच्छा देत असतांना संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत दोन्ही गटाचे समसमान संचालक निवडून आल्याने गटबाजी व संघर्ष टाळण्यासाठी भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही गट एकत्र करून समन्वयाने एका गटाचा सभापती तर दुसर्‍या गटाचा उपसभापती करून कामकाज करण्याचा तोडगा काढला. प्रथम सभापतीचा बहुमान मला मिळाला.

नवनियुक्त सभापती जगताप यांनी आपल्या भाषणात सत्काराला उत्तर देतांना सभापतिपदाची माळ भुजबळांमुळे मिळाली आहे. या मिळालेल्या संधीचा बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी व नावलौकिकात भर पाडण्यासाठी सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने प्रयत्नशील राहणार, असे डी.के. जगताप यांनी सांगितले.

याप्रसंगी संचालक भिमराज काळे, जयदत्त होळकर, छबुराव जाधव, राजेंद्र डोखळे, सोनिया होळकर, सुवर्णा जगताप, डॉ.श्रीकांत आवारे, तानाजी आंधळे, पंढरीनाथ थोरे, महेश पठाडे, राजेंद्र बोरगुडे, प्रविण कदम, बाळासाहेब दराडे, रमेश पालवे, सचिव नरेंद्र वाढवणे आदी संचालक मंडळ तसेच हरिश्चंद्र भवर, तुकाराम गांगुर्डे, बबन शिंदे, उपसरपंच रामनाथ शेजवळ, राजेंद्र चाफेकर, अरविंद टापसे, सुधीर झांबरे, मंगेश गवळी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग सदस्य तथा येवल्याचे माजी नगराध्यक्ष हुसेन शेख यांनी जगताप यांच्या निवासस्थानी जावून त्यांना शुभेच्छा दिल्या. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पवन सुपनर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. निवडीनंतर गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

गत पंचवार्षिक निवडणुकीत 2019 ते 2023 या काळात लासलगाव बाजार समिती सभापतीपद सुवर्णा ज्ञानेश्वर जगताप यांनी भूषवले होते. या पंचवार्षिकमध्ये त्यांचे पती भाजप पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी तथा भुजबळ समर्थक ज्ञानेश्वर जगताप हे लासलगाव बाजार समिती सभापतिपदी विराजमान झाले.

15 एप्रिलच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष
ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी लासलगाव बाजार समितीच्या निवडणुकीत अडते आणि दलाल यांना दोन मतदानाचा हक्क असताना तो कोणत्या अधिकारात नाकारण्यात आला, असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला होता. यावरुन नवीन सभापती आणि उपसभापती निवडीचा पेच निर्माण झाला होता. यानंतर ज्ञानेश्वर जगताप व बाळासाहेब दराडे यांनी सदर निवडणूक घेण्यासाठी मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका मा. उच्च न्यायालयाने मंजूर केल्यामुळे सभापती व उपसभापती निवडीचा मार्ग मोकळा झाला. मात्र याबाबत याचिकाकर्ते ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी आपले अधिकचे म्हणणे मांडण्यासाठी अधिकचा वेळ मागितल्याने मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी आता 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. आता 15 एप्रिल रोजी मा. उच्च न्यायालयाचा काय निकाल येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा ७ तारखेला होईल – परिवहन मंत्री प्रताप...

0
मुंबई । प्रतिनिधी Mumbai यापुढे राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होईल,याची जबाबदारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझी असेल! असे नि:संदिग्ध ग्वाही परिवहन...