Wednesday, May 29, 2024
Homeनाशिकमालेगाव : मक्यावर लष्करी अळीचा हल्ला

मालेगाव : मक्यावर लष्करी अळीचा हल्ला

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

तालुक्यात तीन आठवड्यांपूर्वी पेरणी झालेल्या खरीप पिकांना गत आठवड्यातील समाधानकारक पावसाने तारले असतांनाच दुसरीकडे मका पिकावर पडलेल्या अमेरिकन लष्करी अळीने मारले आहे. तालुक्यातील पिंपळगाव, दाभाडी, आघार, जळगाव, रावळगाव परिसरात लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे मका उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

- Advertisement -

चार-पाच वर्षापासून मालेगाव तालुक्यातील शेतकरी अस्मानी संकटांचा सामना करीत आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. कांद्याला बाजारभाव मिळाला नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले. त्यानंतरही नव्या उमेदीने बळीराजा खरीप हंगामासाठी सज्ज झाला. हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे आजवर सोसलेले नुकसान काहीअंशी भरून निघण्याच्या आशेने शेतकर्‍यांनी खरिपाचे नियोजन केले.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने दमदार सुरूवात केली. मृग व रोहिणी नक्षत्रात झालेल्या पावसावर शेतकर्‍यांनी खरिपातील बाजरी, मका, तूर, भुईमूग, कपाशीची लागवड केली. त्यानंतर पावसाने पोबारा केल्याने शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होते. पंधरवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनारागमन झाले. सलग दोन, तीन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे पिकांना एकीकडे जीवदान मिळाले. लागवड केलेला मकाही तरारला असतांनाच अमेरिकन लष्करी अळीने थैमान घालण्यास सुरुवात केल्यामुळे शेतकर्‍यांवर पीक मोडून टाकण्याची वेळ आली आहे.

कृषि विभागाने तालुक्यात ३३ हजार ५४९ हेक्टर क्षेत्रावर मका लागवडीचे उद्दिष्ट ठेवले असतांना प्रत्यक्षात ३५ हजार ८६५ हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड झाली आहे. मका हे हमखास उत्पन्न देणारे नगदी पिक असल्यामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असला तरी शेतकरी मका लागवडीकडे आकर्षित झाले आहेत. परिणामी यंदाही मका लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सन २०१८ च्या खरीप हंगामात कर्नाटक राज्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला होता. त्यानंतर नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी लष्करी अळी आढळून आली होती.

गतवर्षी तर संपूर्ण जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. यावर्षीही लष्करी अळीचे आक्रमण होत असून फवारणी करून देखील अळीचा नायनाट होत नसल्याने मका उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.फवारणीचा उपयोग होत नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी मक्यावर नांगर फिरवलाआहे.आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी मक्यावरील लष्करी अळीमुळे पिक हातचे जाण्याच्या भीतीने हवालदिल झाला आहे.

लष्करी अळीचे संकट दरवर्षी येत असल्यामुळे शेतकर्‍यांना लाखो रुपयांचा फटका बसत आहे. याबाबत शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे. लष्करी अळीचा नायनाट करण्यासाठी कृषी विभागातर्फे संशोधन करून शासनाने अल्पदरात शेतकर्‍यांना किटकनाशके उपलब्ध करून द्यावीत.

डॉ. जयंत पवार ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

- Advertisment -

ताज्या बातम्या