संगमनेर (वार्ताहर)- भारत सरकारच्या दशवार्षिक जनगणनेची तयारी सुरू करण्यात आली असून यासंदर्भाने राज्यात 1 मे पासून कार्यवाही सुरू होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मे महिन्याची शिक्षकांची सुट्टी बुडणार आहे.
दर दहा वर्षांनी भारताची जनगणना करण्यात येते. 2001 नंतर 2011 साठीची जनगणना यावर्षी सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी 1 मे ते 15 जून या कालावधीमध्ये घराची यादी करणे, क्षेत्र विभाजन करणे, घरांना क्रमांक देणे या स्वरुपाची कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागणार आहे. यासाठीचे मनुष्यबळ प्राथमिक- माध्यमिक शिक्षकांमधून उपलब्ध करून घेण्यात येणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन राज्यातील जनगणना अधिकार्यांनी यासंदर्भातील सूचना शिक्षण विभागाला देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांना 1 मे ते 15 जून या कालावधीमध्ये उन्हाळी सुट्टी असते.
याच कालावधीमध्ये सदरची कामे करण्यात येणार असल्याने, शिक्षक आपले विविध कार्यक्रम सुट्टीत नियोजित करीत असतात. त्यानुसार परदेशात जाणे, परराज्यात जाणे किंवा तत्सम नियोजन करत असल्यामुळे संबंधित शिक्षकांना या कालावधीत मुख्यालय सोडण्याची अनुमती देण्यात येऊ नये असेही निर्देश देण्यात आले आहेत. या कालावधीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापक किंवा अधिकार्यांनी संबंधित शिक्षकाची रजा मंजूर केल्यास व त्यामुळे जनगणनेच्या कामात व्यत्यय आल्यास संबंधित अधिकारी किंवा मुख्याध्यापक यांच्याविरोधात प्रशासकीय कारवाई करण्याचा इशाराही आदेशात देण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत शिक्षकांना जनगणनेची कामे करावी लागणार असल्याने सुट्टीवर पाणी सोडावे लागणार आहे.
जनगणनेच्या रजेचे काय होणार
दश वार्षिक जनगणनेसाठी यापूर्वी शिक्षक कामाचे दिवस वापरत असल्यामुळे त्यांना यापूर्वी 45 दिवस रजा मंजूर करण्यात आलेली होती. त्यानुसार संबंधित शिक्षकांना सदरची रजा सेवा पुस्तकात नोंदवून त्यांच्या सेवेच्या कालावधीत त्याचा उपभोग घेता येत होता. तथापि यावर्षी सुट्टीच्या कालावधीमध्ये जनगणना प्रक्रिया सुरू करण्यात आल्यामुळे शिक्षकांची सुट्टी बुडणार आहे. त्यामुळे शिक्षकांची सुट्टी व त्या कालावधीची रजा कशा स्वरूपात मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.