Saturday, May 4, 2024
Homeनगरफरार असलेल्या सराईत गुन्हेगारांना पकडण्याची मोहीम

फरार असलेल्या सराईत गुन्हेगारांना पकडण्याची मोहीम

कोरोनाच्या वातावरणाचा फायदा घेण्याची जिल्हा पोलिसांची शक्कल

अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक जबरी गुन्हे करून पसार झालेले, वर्षांनुवर्षे पोलिसांना गुंगारा देणार्‍या सराईत गुन्हेगारांना पकडण्यासाठी काही पोलीस कामाला लागले आहेत. कोरोना व्हायरसमुळे संचारबंदी व जमावबंदी आदेश असल्याने अनेक सराईत गुन्हेगार आपापल्या घरी थांबले असतील. यामुळे ते सहज हाती लागतील, या दृष्टिकोनातून पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची धरपकड करण्याची मोहीम हाती घेतली आहे. सराईत गुन्हेगारांना पकडण्याचे आदेश नव्याने दाखल झालेले पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी दिले आहेत.

- Advertisement -

दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यामध्ये संचारबंदी व जमावबंदी लागू केली आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनची कडेकोट अंमलबजावणी सुरू आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लोकांना घरात थांबण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे लोक घरात व पोलीस रस्त्यावर असल्याने गुन्हेगारीमध्ये घट झाली आहे.

गुन्हेगारीच्या बाबतीत अग्रेसर असलेला जिल्हा कोरोनामुळे गार पडला आहे. त्यातच अनेक महिन्यापासून रिक्त असलेले जिल्हा पोलिस प्रमुखांचे पद तात्काळ भरण्यात गेले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून अखिलेश कुमार सिंह नव्याने रुजू झाले. त्यांच्यासमोर सध्या तरी कोरोनाची परिस्थिती हाताळण्याचे आव्हान आहे. अनेक पोलीस याच बंदोबस्तात आहेत. या परिस्थितीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस वेगळ्याच कामात आहेत.

नव्याने रुजू झालेले पोलिस अधीक्षक सिंह यांनी अनेक दिवसापासून पसार असलेल्या सराईत गुन्हेगारांना पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. तशा सूचना त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संचारबंदी व जमावबंदीचा आदेश असल्याने व सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने गुन्हेगाराला कोणी आश्रय देऊ शकत नाही. या दृष्टिकोनातून सराईत गुन्हेगार एखाद्या ठराविक ठिकाणी स्थानबद्ध झालेले असतील. जिल्ह्यात खून, दरोडा, जबरी चोरी, आर्थिक फसवणूक करून अनेक आरोपी पसार झाले आहेत.
पोलीस त्यांचा शोध घेत असून ते मिळून येत नाहीत. या परिस्थितीत असे आरोपी तत्काळ मिळून येतील. सराईत गुन्हेगारांना अटक केल्यानंतर अनेक मोठ्या गुन्ह्याची उकल होईल व भविष्यात गुन्हेगारी रोखण्यात काही प्रमाणात यश येईल, हा दृष्टिकोन समोर ठेवून ही मोहीम सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

- Advertisment -

ताज्या बातम्या