Saturday, May 4, 2024
Homeनगरगरजूंना आदिक कुटुंबीय देणार 32 क्किंटल गहू, तांदळासह 16 क्किंटल हरभरा दाळ

गरजूंना आदिक कुटुंबीय देणार 32 क्किंटल गहू, तांदळासह 16 क्किंटल हरभरा दाळ

प्रत्येक प्रभागातील नगरसेवकामार्फत होणार वाटप; नगरसेवकही टाकणार भर

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील गोरगरीब, गरजू, हातावर पोट असणारे उपाशीपोटी राहू नये यासाठी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र कृषक समाज व आदिक कुटूंबियांच्या वतीने 32 क्विंटल गहू, तांदूळ व 16 क्विंटल हरभरा दाळीचे वाटप करण्यात येणार आहे. हे साहित्य शहरातील प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांना सुपूर्द करण्यात आले.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लॉकडाऊन आहे. त्यामुळे मजूर, गोरगरिबांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली. हा लॉकडाऊन आणखी 15 दिवसांनी वाढणार असल्याने असंख्य नागरिकांसमोर आता पोटापाण्याचा प्रश्न उभा राहणार आहे. वडिल स्व. ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांच्याच पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र कृषक समाज व अविनाश आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली मदतीचा छोटासा प्रयत्न असल्याचे सांगून नगराध्यक्षा आदिक म्हणाल्या, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणीही उपाशी पोटी राहू नये यासाठी शहरातील गरजूंना नगरसेवकांच्या माध्यमातून धान्याचे वितरण करण्यात येणार आहे.

यात प्रत्येकी 32 क्विंटल गहू व तांदूळ व 16 क्विंटल हरभरा डाळीचा समावेश आहे. शहरातील 32 प्रभागातील नगरसेवक राजकारणविरहीत कोणताही भेदभाव न पाळता आपल्यापरीने गरीब, गरजू कुटूंबांना मदत करत आहेत. या मध्यमातून त्यांना हातभार लागावा म्हणून प्रत्येक नगरसेवकाला 100 किलो गहू, तांदूळ व 50 किलो हरभरा दाळ देण्यात येत आहे. या धान्यात नगरसेवकांनी त्यांच्याकडील अन्नधान्याची भर घालून ते आपल्या प्रभागातील गरजूंना वितरीत करणार आहेत. तसेच शहरातील 460 दिव्यांगांना मास्क, सॅनिटायझर, टॉवेल व साबण असा किट वाटण्यात येणार आहे.

दशमेशनगरला गुरूद्वार व सरस्वती कॉलनी येथील साईमंदिरात अन्नछत्र चालू असून त्यांनाही प्रत्येकी 100 किलो तांदूळ देण्यात येणार असल्याचे आदिक यांनी सांगितले. यावेळी डॉ. रवींद्र जगधने, नगरसेवक राजेंद्र पवार, रवी पाटील, रोहित शिंदे, दीपक चरण चव्हाण, अल्तमश पटेल, डॉ. ऋतुजा जगधने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या