अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर प्रेस क्लबच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत यशवंतराव गडाख यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी (उत्कृष्ट प्रशासन प्रमुख), जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी जगन्नाथ भोर (उत्कृष्ट प्रशासन अधिकारी), कोहीनूर वस्त्रदालनाचे प्रदीप गांधी (आदर्श व्यावसायिक), नोबेल हॉस्पिटलचे डॉ. बापूसाहेब कांडेकर (उत्कृष्ट वैद्यकीय सेवा), ढवळपुरीचे (पारनेर) सरपंच डॉ. राजेश भनगडे (आदर्श कृतीशील सरपंच) व जिल्हा परिषदेच्या खांडके (ता. नगर) येथील शाळेला ‘आदर्श शाळा’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पत्रकारांनाही पुरस्कारांनी गौरविण्यात येणार असून, यामध्ये ‘सार्वमत’चे वृत्तसंपादक बद्रिनारायण वढणे यांना बेस्ट रिपोर्टर पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी दिली.
अहमदनगर प्रेस क्लब संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष सध्या सुरू असून, यानिमित्ताने वर्षभर पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ व त्यानिमित्ताने आयोजित केल्या जाणार्या विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. सामाजिक उत्तरदायित्व जपणार्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांसोबतच पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणार्या विविध दैनिकांच्या प्रतिनिधींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रेस क्लबचे उपाध्यक्ष राजेंद्र झोंड व अरुण वाघमोडे यांनी दिली.
पत्रकार दिनानिमित्त दि. 6 जानेवारी रोजी आयोजित केल्या जाणार्या कार्यक्रमात वर्षभरात विविध पुरस्कार प्रात केलेल्या पत्रकार पुरस्कारार्थींचा गौरव केला जाणार असल्याचे सचिव मुरलीधर कराळे, सहसचिव दीपक कांबळे यांनी सांगितले. प्रेस क्लबचे सदस्य असलेल्या पत्रकारांचा प्रत्येकी पाच लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला असून, याच कार्यक्रमात रौप्य महोत्सवी वर्षाची भेट म्हणून विमा पॉलिसीचे वाटप केले जाणार असल्याचे खजिनदार ज्ञानेश दुधाडे यांनी सांगितले.
रौप्य महोत्सवी समारंभात ‘बेस्ट रिपोर्टर’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार्या पत्रकारांमध्ये बद्रीनारायण वढणे (सार्वमत), दीपक रोकडे (सकाळ), अण्णासाहेब नवथर (लोकमत), समीर दाणी (पुण्यनगरी), दीपक कांबळे (दिव्य मराठी), मयुर मेहता (पुढारी), अशोक परुडे (महाराष्ट्र टाईम्स), रवी कदम (प्रभात), मोहिनीराज लहाडे (लोकसत्ता), मिलिंद देखने (सामना), दिलीप वाघमारे (केसरी), ललित गुंदेचा (नवा मराठा), भाऊसाहेब होळकर (समाचार), सुनील चोभे (नगर सह्याद्री), संदीप रोडे (नगर टाईम्स), अंबरीश धर्माधिकारी (अहमदनगर घडामोडी), सुभाष मुदळ (नगर स्वतंत्र), प्रशांत पाटोळे (मराठवाडा केसरी), निशांत दातीर (नवाकाळ), अशोक सोनवणे (लोकमंथन), अनिल शहा (प्रेस फोटोग्राफर), सुशील थोरात (जय महाराष्ट्र, न्यूज चॅनेल), अमीर सय्यद (ए टीव्ही, लोकल न्यूज चॅनेल) यांचा समावेश आहे. याशिवाय रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने काही निवडक ज्येष्ठ पत्रकारांचाही विशेष गौरव करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष शिर्के यांनी सांगितले.