अकोले (प्रतिनिधी) – शेतकरी कर्जमाफीचा काढण्यात आलेल्या शासनादेश म्हणजे विश्वासघाताची परिसीमा आहे. शेतकर्यांना क्रुरपणे फसविले गेले आहे, असा आरोप मार्क्सवादी किसान सभेचे प्रदेश सचिव कॉ. डॉ. अजित नवले यांनी केला.
शासनादेशाच्या पाचव्या कलमानुसार व्याज व मुद्दल मिळून दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकर्यांना कर्जमुक्तीसाठी अपात्र करण्यात आले आहे. मागील कर्जमाफीत अशा शेतकर्यांसाठी एक रकमी परतफेड योजनेअंतर्गत दीड लाखाची कर्जमाफी तरी होती. नव्या योजनेत दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्यांना सरसकट अपात्र करण्यात आले आहे.
राज्यात बहुतांश शेतकर्यांच्या शिरावर दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असल्याने लाखो शेतकरी पहिल्याच अटीत अपात्र ठरविण्यात आले आहेत.
शिवाय योजना अटी शर्तींची नसेल असे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र मागील योजनेच्या बहुतांश सर्वच अटी शासनादेश काढताना आहे तशाच यावेळीही लावण्यात आल्या आहेत. शेतकर्यांशी केलेला हा विश्वासघात आहे.
अन्नदात्यांशी केलेली ही बेईमानी आहे. सरकारने हा शासनादेश त्वरित मागे घ्यावा व शेतकर्यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे विनाअट शेतकर्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी किसान सभेच्यावतीने डॉ. अजित नवले यांनी केली आहे.