Friday, May 3, 2024
Homeनगरदारू पिल्याने म्हैसगावात तरूणाचा मृत्यू

दारू पिल्याने म्हैसगावात तरूणाचा मृत्यू

संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको : पोलिसांचा निषेध

राहुरी (प्रतिनिधी)- राहुरी तालुक्यातील पश्चिम डोंगराळ दुर्गम भागातील कोळेवाडी येथील शिवाजी तुकाराम घोडे (वय 40) यांचे दारू पिल्याने म्हैसगाव बाजारपेठेतच निधन झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी करीत राहुरी पोलिसांचा निषेध केला.

- Advertisement -

घोडे हे मंगळवारी आठवडे बाजारामध्ये पेठेत म्हैसगाव- राहुरी रस्त्याच्याकडेला मृतावस्थेत आढळून येताच म्हैसगावतील ग्रामस्थांनी राहुरी पोलिसांशी संपर्क केला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठविला. मात्र, एका आदिवासी तरुणाचा दारू पिल्याने मृत्यू होऊनही दोन दिवस झाले तरी राहुरी पोलिसांनी अवैध दारूविक्री करणारांवर काहीही कारवाई केली नाही.

या घटनेमुळे संतप्त झालेल्या म्हैसगाव, कोळेवाडी येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको करून राहुरी पोलिसांचा निषेध करीत म्हैसगाव बाजारतळावर निषेध सभा घेऊन अवैध दारू दुकाने बंद झाली पाहिजेत न केल्यास परिसरातून महिला व नागरिकांचा राहुरी पोलीस स्टेशनवर मोर्चा नेऊन प्रशासनाचे लक्ष वेधले जाईल. अन्यथा वरिष्ठ पातळीवर या परिसरातील पोलीस खात्याबद्दलची संपूर्ण अवैध धंद्याबद्दलची माहिती सामूहिक तक्रार अर्जाद्वारे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

म्हैसगाव परिसरातील अवैध दारू विक्रीतून मोठे रॅकेट सक्रिय असून या ठिकाणी बाहेरून अवैध दारूचा पुरवठा करणारे व विक्री करणार्‍यांचे राहुरी पोलिसांशी अर्थपूर्ण संबंधामुळे अवैध दारू विक्रेते मगरूर झाले आहेत. अनेक वेळा ग्रामस्थांनी दारूबंदीचे ग्रामसभेद्वारे बहुमताने ठराव मंजूर करून अवैध दारू विक्री बंद झाली पाहिजे म्हणून प्रयत्न केले. मात्र, अवैध दारूविक्री बंद झाली नाही. उलट या व्यवसायाने गावात मारामार्‍या, भांडणे होऊन शांततेचा भंग झाला आहे. या प्रकाराने ग्रामस्थ त्रस्त होऊन आता अवैध दारू धंद्याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

या परिसरातील अनेक छोट्या मोठ्या चोर्‍यांचा तपास लागला नसताना या परिसरात अवैध दारूमुळे अनेक गुन्हेगारी वृतीचे लोक दहशत करून मंगळवारी बाजारात आरडाओरडा करणे, दहशत निर्माण करीत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक तक्रार करीत नाही. म्हैसगाव परिसरात कायदा व सुव्यवस्था कोलमडल्यामुळे राहुरी पोलिसांचा काहीही धाक राहिला नाही. या परिसरात बोकड चोरी, मोटर सायकल चोरी, दानपेटी चोरी, पेठेतील दुकानाची चोरी, रस्तालूट अशा अनेक चोर्‍यांचे तपास लागले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

पोलिसांच्या निष्क्रीय कारभारामुळे म्हैसगाव बाजारपेठेत दहशत निर्माण झाली आहे. या प्रश्नाकडे जिल्हा पोलीस प्रमुख, अप्पर पोलीस अधीक्षक, डिवायएसपी यांनी तातडीने लक्ष घालून अवैध दारूविक्री बंद करून कर्तव्यात कसूर करणार्‍या पोलिसांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी म्हैसगाव परिसरातून सखाहरी काकडे, सरपंच दीपक गागरे, विजय आंबेकर, दत्तू गागरे, काशिनाथ कोकाटे, गंगा काकडे, सागर दोंदे आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या