Tuesday, May 7, 2024
Homeनगर‘स्वीकृत’च्या नियुक्तीवरून भाजपमध्ये रणधुमाळी

‘स्वीकृत’च्या नियुक्तीवरून भाजपमध्ये रणधुमाळी

महापौर, उपमहापौरांनी गांधींना डावलले; शिवसेनेकडून आढाव, शेळके

अहमदनगर (प्रतिनिधी) – स्वीकृत सदस्य नियुक्तीचे वाद चांगलेच उफाळण्याची शक्यता आहे. भाजपने रामदास आंधळे यांचे नाव दिल्याने पक्षात असंतोष असून, शिवसेनेने नव्याने शिवसेनेत आलेले संग्राम शेळके आणि मध्यंतरी महापालिकेतील बूट प्रकरणात गाजलेले मदन आढाव यांना संधी दिल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादीने मात्र आपील नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत.

- Advertisement -

महापालिकेत पाच स्वीकृत सदस्यांची उद्या निवड होत आहे. तब्बल वर्षभराच्या विलंबानंतर ही निवड होत आहे. यामध्ये पक्षीय बलाबलनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आणि भाजपचा एक सदस्य नियुक्त होऊ शकतात. आपल्याला संधी मिळावी म्हणून प्रत्येकाने फिल्डिंग लावली होती. यामध्ये महापालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीत पराभूत झालेल्यांचा समावेश आहे. आज स्वीकृत सदस्यासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. हे अर्ज देखील बंद पाकिटात नगरसचिव कार्यालयात दाखल करावयाची होती. त्याची छाननी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी उद्या सभेत करणार आहेत. त्यांनी अगोदरच निकषानुसार नावे असावीत, असा दंडक घातलेला आहे.

सायंकाळी उशीरापर्यंत कोणाची नावे येतात, यासाठी इच्छूक आणि पक्षाचे कार्यकर्ते महापालिका कार्यालयात तळ ठोकून होते. भाजपमध्ये या प्रकरणावरून चांगलेच रण पेटल्याचे दिसत आहे. किशोर बोरा, किशोर डागवाले यांची नावे स्पर्धेत होती. शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी सांगतील, तेच अंतिम होईल, असे मानले जात होते. मात्र घडले भलतेच. महापौर बाबासाहेब वाकळे आणि गटनेत्या असलेल्या उपमहापौर मालन ढोणे यांनीच या नियुक्तीवर वर्चस्व मिळविल्याचे बोलले जाते. डागवाले सायंकाळी उशीरापर्यंत गटनेत्यांची प्रतिक्षा करत महापालिकेत तळ ठोकून होते.

गांध यांचे निरोपही या दोघांनी घेतले नसल्याची चर्चा आहे. ‘सक्षम’ असलेले रामदास आंधळे यांचे नाव या पदासाठी दिल्याचे सांगण्यात आले. पक्षासाठी आंधळे यांचे योगदान काय, इथपासून आता चर्चा सुरू झाली असून, त्याचा शेवट ‘उलाढाली’वर होत आहे.

शिवसेनेकडून शहरप्रमुख दिलीप सातपुते, हर्षवर्धन कोतकर, आकाश कातोरे आदी नावे चर्चेत होती. मात्र ही सर्व नावे मागे पडून कोतकर यांचे मेव्हणे संग्राम शेळके आणि मदन आढाव यांची नावे दिल्याचे सांगण्यात आले. गटनेते संजय शेंडगे या दोघांसह महापालिकेत आले आणि त्यांनी बंद पाकीट नगरसचिव कार्यालयात दाखल केले.

कोतकर हे केडगाव परिसरातील असून, ते सुरूवातीपासून इच्छूक होते. मात्र आता त्यांच्या मेव्हण्यालाच संधी मिळाल्याने ते नाराज नसतील, असे सांगण्यात येते. मदन आढाव हे नाव मात्र वादग्रस्त आहे. काही महिन्यांपूर्वी महापालिकेत आंदोलन करताना तत्कालीन शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्यावर बूट फेकण्याचा प्रकार घडला होता. त्यातील प्रमुख आरोपी आढाव आहेत. विशेष म्हणजे त्यावेळी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड महापालिकेत उपस्थित होते. त्याच आढाव यांना स्वीकृत सदस्यपदाची संधी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अधिकार्‍यांना बूट फेकून मारण्याचे हे बक्षीस असल्याची चर्चा सुरू झाली.

राष्ट्रवादीकडून कोणाची नावे येणार, याबाबत बरीच गोपनियता पाळण्यात आली. ती शेवटपर्यंत तशीच होती. गटनेते संपत बारस्कर यांनी नगरसचिव कार्यालयात बंद पाकीट दाखल केले. यात नावे कोणती हे सांगण्यास त्यांनी नकार दिला असला, तरी माजी नगरसेवक विपूल शेटिया आणि बाबा गाडळकर यांची नावे असल्याची चर्चा आहे. बंद पाकिटातील ही नावे तेथे उघड झाली असली, तरी नेमकी पाकिटात तीच नावे आहेत का, याबाबतही साशंकता आहे.

राष्ट्रवादीकडून फुलसौंदर?
शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचे नाव राष्ट्रवादीकडून चर्चेत होते. दुपारी उशीरापर्यंत यावर खल सुरू असल्याचे समजते. मात्र या नावास फुलसौंदर यांच्या प्रभागातीलच काहींनी विरोध दर्शविल्याने हे नाव मागे पडल्याचे बोलले जाते. फुलसौंदर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून घ्यायचा आणि त्यांना स्वीकृत सदस्यपदी संधी द्यायची, अशा हालचाली होत्या. सायंकाळी गटनेते संपत बारस्कर बंद पाकीट घेऊन आल्यानंतरही त्यांनी याबाबत काही बोलण्यास नकार दिला. पाकिटात बाबा गाडळकर यांचे नाव असले, तरी कदाचित ते फुलसौंदरचेही असू शकते, अशीही चर्चा होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या