Monday, October 28, 2024
Homeनगरनिर्भया न्यायासाठी अण्णांचे मौन आंदोलन सुरू

निर्भया न्यायासाठी अण्णांचे मौन आंदोलन सुरू

पारनेर (तालुका प्रतिनिधी) – निर्भया प्रकरणातील आरोपींना लवकर फाशी देण्यात यावी, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेचा तपास तातडीने करून त्याबाबतची सुनावणी जलदगतीने करून निकाल त्वरित द्यावा, महिलांसाठी राष्ट्रीय पातळीवर हेल्पलाईन ठेवावी, तसेच महिला अन्यायाच्या घटऩांचा तपास महिला अधिकार्‍यांनीच करावा, आदी मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज (ता.20) पासून राळेगणसिध्दी येथील संत यादवबाबा मंदिरात मौन आंदोलन सुरू केले.

याबाबत सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर बेमुदत उपोषणही सुरू करणार असल्याचे हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शुक्रवारी सकाळी हजारे यांनी यादवबाबा व विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले व यादवबाबा मंदिरात मौन आंदोलनास सुरूवात केली. नवीन सरकार स्थिर झाले नसतानाच हजारे यांच्या उपोषणाला ते कसे तोंड देणार, हे आगामी काळात दिसून येणार आहे.देशभरातील महिलांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहेत. मात्र या घटनाचा तपास अतिशय विलंबाने होतो.

- Advertisement -

न्यायदानात होणारा विलंब हेच खरे जनतेच्या नाराजीचे कारण आहे. त्यासाठी अशा प्रकरणाचे निकाल जलद होणे गरजेचे आहे. तसेच महिलांवर अत्याचार होतात, तर अशा प्रकरणाचे तपासी अधिकारीही महिलाच असाव्यात, अशी मागणीही हजारे यांनी यावेळी केली. दिल्लीतील निर्भया प्रकरणातील आरोपींना सुद्धा अद्यापही फाशी देण्यात आली नाही. या दिरंगाईमुळे अनेक ठिकाणी महिला व युवतींवरील अत्याचार करणार्‍या नराधमांचे धाडस वाढत असल्याचेही हजारे म्हणाले.

आंदोलने शांततेच्या मार्गाने हवीत – 
राष्ट्रीय नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सध्या देशभरात हिंसक मार्गाने सुरू असलेली आंदोलने चुकीची आहेत. सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीने सर्वांना दिला आहे, मात्र ती आंदोलने शांततेच्या व अहिंसक मार्गाने केली पाहिजेत. मी गेली 30 वर्षे आंदोलने करत आहे, मात्र सर्व आंदोलने अहिंसक व शांततेच्या मार्गाने केली आहेत. हिंसक मार्गाने केलेल्या आंदोलनात होणारे नुकसान हे राष्ट्रीय संपत्तीचे जरी असले तरी ते पर्यायाने आपले म्हणजे जनतेचेच नुकसान असते, असेही हजारे यावेळी म्हणाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या