अण्णा हजारे यांच्या मौन आंदोलनात सातव्या दिवशी पारनेर, मुंबई, राजस्थान मधील कार्यकर्त्यांचा सहभाग
पारनेर/सुपा (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर) – देशामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढले असल्या कारणाने दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशातील जनतेच्या रोषामुळे कायद्यात बदल झाला होता. परंतु आजही दोषींना फाशी झालेली नाही. जलदगती न्यायालयात किमान सहा लाखांवरून अधिक खटले प्रलंबित असून अनेक महिला पीडितांना न्याय मिळालेला नाही. त्यांना न्याय मिळावा, या व इतर मागण्यांसाठी अण्णांचे मौन आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यासाठी आमदार नीलेश लंके नागपूर अधिवेशन संपवून अण्णांच्या भेटीला गेले व आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु माझ्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय व निर्भया प्रकरणातील दोषींना सजा झाल्याशिवाय मी आंदोलन मागे घेणार नाही, असे सांगत अण्णा त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत हे निश्चित केले. मौन आसल्या कारणाने या आशयाचे लिहून आ. लंके यांना सूचित केले. कोट्यवधी रुपये खर्चून जनजागृती होणार नाही, ती या आंदोलनाने होईल असा विश्वास अण्णांनी व्यक्त केला.
नागपूर अधिवेशनातील तालुक्यातील अनेक ज्वलंत प्रश्नांवर अनेक मंत्री महोदया बरोबर, संबंधित खात्याच्या अधिकार्यांबरोबर विविध विषयांवर आमदार लंके यांनी केलेली चर्चा व त्यावरील संबंधित अधिकार्यांच्या प्रतिक्रिया काय आल्या हा सर्व इतिवृत्तांत आमदार लंके यांनी अण्णांना सांगितला.
माझा मतदारसंघ हा अण्णांचा मतदार संघ असून माझ्याकडून जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा आहे. तेव्हा मला प्रत्येक अभ्यासपूर्वक पाऊल, जपून टाकत व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अण्णा तुमचा आशीर्वाद हवा आहे अशी विनंती केली व अण्णांनीही कुठल्याही विधायक कामात मी तुमच्याबरोबर नेहमीच असणार. मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर तुम्ही विधिमंडळात व मी बाहेरून तालुक्याच्या प्रश्नांसाठी नेहमी तुमच्याबरोबर राहीन असा शब्द अण्णांनी दिला. मागील वर्षी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरून एक वेगळा संदेश शरद पवार यांच्याकडे गेला व त्या कृषी प्रदर्शनामुळे पवार यांनी तुम्हाला आर. आर. आबांची उपाधी दिली असेही अण्णांनी सांगितले.
माझ्यासारखा तूही फकीर गडी आहेस, 10 वर्षांपूर्वी तू मला भेटला असता तर तूही अविवाहित राहून माझ्या सारखीच समाजसेवा केली असतीस. तुम्ही वेळेवर जेवत नाही वेळेवर झोपत नाही स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करत तालुका हेच कुटुंब आहे व त्यांची सेवा रात्रंदिवस करत आहे. तेव्हा तुम्ही स्वतःच्या तब्यतीची काळजी घ्या, शरीर संपदा सांभाळा, पारनेरचा पाणी प्रश्न व इतर ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी तालुक्याला तुमच्या सारख्या फकीर माणसाची गरज आहे. मतदारसंघातील कोणतेही प्रश्न तुम्ही सोडवू शकता असा विश्वासार्थ वडीलकीचा सल्लाही अण्णांनी आमदार लंके यांना दिला.
तालुक्याच्या पाणी प्रश्नाबद्दल विविध विषयांच्यावर चर्चा करत पाणीप्रश्न सोडवण्यासाठी अण्णांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करण्यासाठी सुरुवात करणार असा शब्द आमदार लंके यांनी अण्णांना दिला. या सर्व कार्यात मी तुमच्या बरोबर असेन अशा प्रकारे अण्णांनीही आमदार लंके यांच्या चर्चेला मौन असल्या कारणाने लिहून देत दुजोरा दिला.
यावेळी आमदार लंके यांच्या समवेत प्रतिष्ठानचे प्रांताध्यक्ष, सुदामराव पवार, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव घुले, जयसिंगभाऊ मापारी, दत्ता आवारी, कारभारी पोटघन, डॉ. कावरे, अरुण पवार, श्रीकांत चौरे, गणेश साठे, सचिन गवारे, दादा दळवी, नंदू सोंडकर, बाबूजी ठोंबरे, भाऊ रासकर, बाजीराव कारखिले, संदीप चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महिलाच्या सुरक्षेसाठी व दिल्लीतील निर्भयाच्या आरोपीना फाशी, यासह महिलांच्या विविध प्रश्नांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या मौन आंदोलनात सातव्या दिवशी पारनेर, मुंबई, राजस्थान, सोनई मधील कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी देशभरात हेल्पलाईन सुरू करावी, महिला अत्याचार प्रकरणी न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची लवकर सुनावणी होऊन दोषींना शिक्षा द्यावी यासह काही प्रश्नांबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारपासून राळेगणसिद्धीत मौन आंदोलन सुरू केले आहे. गुरुवारी सकाळी डॉ. सादिक राजे यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेजच्या प्रा. मनीषा पंडित, पूनम खोसे, यांच्यासह प्रियंका गुंड, गायत्री रणशिंग, क्रांती माटे, कांता पथवे, सोनाली मधे, शुभांगी भागवत, रोहिणी मोरे, वैशाली बारामते, अंबिका खोरे, आरती शिंदे, दुर्गा आहेर,स्मिता बांडे, अजुम शेख, शिवाजली लवांडे, आकाशा सोनवणे, सोनाली कांगुणे, दीपाली पंडित,ऋतुजा गायकवाड, तेजस्विनी कामजे आदींसह राजस्थान, मुंबई येथील कार्यकर्त्यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभाग नोंदवला. दरम्यान संदीप पठारे, अमोल झेंडे, मेहबूब शेख, श्याम पठाडे, आदी उपस्थित होते.