सचिन दसपुते
अहमदनगर – सुगंधी तंबाखूचा (मावा) अवैध धंदा हा फक्त शहरापुरता मर्यादित राहिला नसून शहराच्या आजूबाजूची उपनगरे आणि गावांमध्येही फोफावत आहे. त्यामुळे या अवैध धंद्यातील उलाढाल प्रतिदिन लाखो रुपयांच्या पुढे आहे. या धंद्यातील लाखो रुपयांची माया अनेकांना मोह घालणारी आहे. त्यामुळे छुप्यापद्धतीने सुरू असलेले सुगंधी तंबाखूच्या निर्मितीच्या मिनी कारखान्यांचे अड्डे यांची माहिती अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांना नसली तर नवलच? त्यामुळे या अवैध धंद्याला नेमके कोणाचे बळ आहे हा प्रश्न उपस्थित होतो.
पुणे, सोलापूर, बीड, मनमाड, औरंगाबाद, ठाणे, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाण म्हणजे अहमदनगर शहर आहे. या सातही जिल्ह्यांतील वाहतूक अहमदनगर शहरातून जाते. त्यामुळे अहमदनगर शहर हे नेहमीच गुन्हेगारीला अश्रय देणारे ठरले आहे. (दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळ्यांवर केलेल्या कारवाईतून हे स्पष्ट होते). यातूनच अवैध धंदे डोके वर काढतात. त्यातीलच सुगंधी तंबाखूच्या निर्मितीचा धंदा एक आहे. अहमदनगर शहर विस्तारत आहे. केडगाव, बुरूडगाव, सावेडी, बोल्हेगाव, एमआयडीसी परिसर, भिंगार आदी उपनगरात त्याचा विचार करता येईल. नवनवीन वसाहतींची झपाट्याने निर्मिती होत आहे, तशीच त्याला धरून अपप्रवृत्ती फोफावत आहे. नागरीकरणात बेरोजगारी देखील वाढली आहे. त्यातूनतच शॉर्टकटने पैसा कमाविण्याला प्राधान्य वाढत आहे. कमी भांडवलात जास्त पैसा मिळवून देणारा हा धंदा जोर धरत आहे.
एमआयडीसीची वाढ खुंटली असली तरी त्यालगतच्या वाढलेल्या नागरी परिसरात सुगंधी निर्मितीचे कारखाने चांगलेच फोफावले आहेत. या कारखान्यांच्या जोरावर अनेकांनी छोटछोट्या पान टपर्या सुरू केल्या आहेत. पान टपरीच्या नावाखाली फक्त सुगंधी तंबाखूची विक्री होण्याचे प्रकार होत आहेत. आज एक सुगंधी तंबाखूचे पाकिट 20 रुपयांना मिळते. दररोज हजारोंच्या घरात पाकिटांची निर्मिती होते. या सुगंधी तंबाखूबरोबरच बंदी असलेल्या सुगंधी माव्याची विक्री छुप्या पद्धतीने होते. काही टपर्यांवर खुलेआम सुगंधी तंबाखूची विक्री व निर्मिती केली जाते. अशांवर कारवाई करण्याचे धारिष्ट ना अन्न व औषध प्रशासनाने दाखविले ना पोलीस प्रशासनाने. कारवाईची भीती दाखवून या दोन्ही प्रशासनाने मात्र आपले हात ओले करून घेतल्याची सर्रास चर्चा आहे. सावेडी उपनगरातील पान टपर्यांवर ही सुगंधी तंबाखू एमआयडासी आणि नगर शहरातून वितरित होते. तारकपूर परिसरातून या सुगंधी तंबाखूला बंदी असलेल्या गुटख्याचे बळ मिळते. यावरून या धंद्याची पाळेमुळे किती खोल असतील याचा विचार थरकाप उडवितो.
अहमदनगर शहरात झोपडपट्टीचा भाग आहे. या भागाचा आधार घेत कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेकांनी सुगंधी तंबाखू निर्मितीचे कारखाने उघडले आहेत. पुढे सुपारी वाळवायची आणि मागे विद्युतयंत्राचा आधार घेत सुगंधी तंबाखूची निर्मिती करायची. सुगंधी तंबाखू तयार झाल्यानंतर तेथील झोपडपट्टीत राहणारे परप्रांतीय लोकांकडून ती प्लॅस्टिकच्या छोट्या पिशव्यांत भरून घ्यायची. असा हा धंदा चालू आहे.
या धंद्यांवर कारवाईची वेळ आली, तरी ती सुगंधी तंबाखू भरणार्यांपर्यंत मर्यादित राहते. उत्पादकांच्या मशीन आणि सुगंधी तंबाखू निर्माण करणारे साहित्य जप्त होण्यापासून वाचते, असे त्या मागील शास्त्र आहे. हे कारवाईचे अधिकार असलेले अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांना देखील चांगलेच माहीत आहे. त्यामुळे या धंद्याची साखळी कोणीच तोडू शकत नाही, अशी सध्याची स्थिती आहे. साखळी न तोडण्यामागे दोन्ही प्रशासनांचे ‘हित’ देखील कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
(क्रमशः)
बनावट रसायनांपासूनची तंबाखू?
भिंगार शहर सुगंधी तंबाखूच्या निर्मितीचे आगर असून, भविष्यात ही धोक्याची घंटा आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये पांगरमल (ता. नगर) बनावट विषारी दारूकांड झाले होते. त्यात 14 जणांचा बळी गेला होता, तर काही जण कायमस्वरूपी जायबंद झाले. ही भिंगारमधील सुगंधी तंबाखूदेखील तशीच विषारी आहे. ती बनावट रसायनांचा आधार घेऊन केल्याची माहिती समोर येत आहे. सुगंधी तंबाखू (मावा) निर्मितीसाठी काही घटक वापरले जातात. सुगंध यावा म्हणून तेज झंडू बाम, आयोडेक्स किंवा मसल पेन दूर करण्याच्या पेस्टचा वापर होतो. परंतु येथे रसायनांचा आधार घेतच बनावट तंबाखू तयार केली जात असल्याचे समजते. त्यामुळे ही बनावट विषारी तंबाखू सुगंधी तंबाखूच्या निमित्ताने युवकांच्या आणि तरुणांच्या तोडांत जात आहे. यातून मोठे विषारी कांड होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अशा व्यवसायावर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.