Monday, November 18, 2024
Homeनगरभिंगारमध्ये ‘सुगंधी तंबाखू’वर छापा

भिंगारमध्ये ‘सुगंधी तंबाखू’वर छापा

कारखान्यातून दोन यंत्रांसह मुद्देमाल जप्त

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहरासह उपनगरांमध्ये सुगंधी तंबाखूची होणारी निर्मिती व विक्री, सुगंधी तंबाखूचे भिंगार, केडगाव, एमआयडीसी परिसरात असलेले मिनी कारखाने व या कारखान्यात तयार होणार्‍या सुगंधी तंबाखूला खाकीचा सपोर्ट आणि अन्न प्रशासनानचे दुर्लक्ष या मथळ्याखाली गेल्या चार दिवसापासून सार्वमतमध्ये सुरू असलेल्या मालिकेची भिंगार पोलिसांनी दखल घेत सुगंधी तंबाखूच्या मिनी कारखान्यांवर छापा टाकून कारवाई केली आहे.

- Advertisement -

सुगंधी तंबाखू तयार करण्यासाठी वापरले जाणारे मशीन, वजन काटा, सुपर तंबाखू, तयार करून ठेवलेली सुगंधी तंबाखू असा 24 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुगंधी तंबाखू तयार करणारा राजेंद्र बबन खळतकर (रा. नागरदेवळे) फरार झाला आहे. पोलिसांनी कारवाई करून देखील पंचनामा करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आले नसल्याने भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

पोलिसांच्या छुप्या आशीर्वादाने व अन्न प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सुगंधी तंबाखूचा धंदा तेजीत आहे. नगर शहरासह उपनगरांत आणि ग्रामीण भागात या धंद्यातून मोठी आर्थिक उलाढाल सुरू आहे. परराज्यांतून सुगंधी तंबाखू (मावा) साठी लागणारा कच्चा माल येतो. अनेक तरुण या धंद्यात उतरले असून, शरीराला अतिशय घातक असलेला हा व्यवसाय आहे.

सुगंधी तंबाखूच्या आणि गुटख्याच्या गोरख धंद्याची पोलखोल दैनिक सार्वमतने ‘ऐतिहासिक भिंगारमध्ये सुगंधी तंबाखुची दरवळ, सुगंधी तंबाखूच्या मायाचा मोह, सुगंधी तंबाखूच्या वाहतुकीला खाकी संरक्षण! आणि सुगंधी तंबाखूला गुटख्याची जोड’ या मथळ्यांखाली पोलखोल केली. या व्यवसायाचा विस्तार किती मोठा आहे, याबाबत आवाज उठविला.

याची दखल घेत भिंगार पोलिसांनी रविवारी रात्री नागरदेवळे येथील राहत्या घरातील मिनी कारखान्यावर छापा टाकला. यामुळे सुगंधी तंबाखूचे मिनी कारखाने थाटले असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळतो. भिंगार पोलिसांनी केलेली कारवाई छोटी असल्याचे मानले जाते. सुगंधी तंबाखू तयार करत असल्याची माहिती भिंगार पोलिसांनी होतीच. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. दोन मशीन जप्त केल्या आहेत.

टपर्‍यांवरून मावा गायब
सुगंधी तंबाखूचे आगर म्हणून भिंगारची ओळख निर्माण झाली आहे. ज्या पद्धतीने भिंगारमध्ये मिनी कारखाने आहेत, त्याच प्रमाणात भिंगारमध्ये मावा विक्री करणार्‍या टपर्‍या आहेत. गेल्या चार दिवसांपासून सार्वमतमध्ये सुरू असलेल्या मालिकेतून या धंद्याबाबत पोलखोल केल्यानंतर आता भिंगारमधील या टपर्‍यांवरून मावा गायब झाल्याचे समोर आले आहे.

अन्न प्रशासनाची टाळाटाळ
भिंगार पोलिसांनी रविवारी रात्री केलेल्या कारवाईची माहिती अन्न प्रशासनाच्या अधिकार्‍यांंना देण्यात आली. गुन्हा दाखल करण्यासाठी अन्न प्रशासनाच्या अधिकार्‍यांशी वेळोवेळी संर्पक करूनही ते आले नसल्याचे भिंगार पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी जप्त केलेला माल अन्न प्रशासनचे अधिकारी घेऊन गेले; परंतु गुन्हा मात्र दाखल केला नसल्याने अन्न प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या