Monday, May 27, 2024
Homeनगरकॅनॉलवरील विनापरवाना मोटारी अखेर लॉकडाऊन

कॅनॉलवरील विनापरवाना मोटारी अखेर लॉकडाऊन

शेवगाव, पाथर्डीतील शेतकर्‍यांना दिलासा : ना. गडाख यांना खा. विखेंनी दिले होते आव्हान

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुळा कालव्यावर नेवासा तालुक्यात 8 ते 10 हजार विनापरवाना पाण्याच्या मोटारी सुरू आहेत. या मोटारीमुळे मुळा कालव्याचे पाणी शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात टेलपर्यंत पोहचत नाही, असा दावा करत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी या मोटारी तातडीने बंद करण्याची आग्रही भूमिका गेल्या आठवड्यात कालवा समितीच्या बैठकीत घेतली होती.

- Advertisement -

यावेळी या मोटारी बंद करू नयेत, अशी स्पष्ट भूमिका जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांनी घेेतली होती. मात्र, या विरोधात खा. विखे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. अखेर प्रशासनाने या मोटारी बंद करण्याच्या कारवाईला वेग दिला आहे. विनापरवाना मोटारी बंद करण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिलेले आहेत.

मुळा कालव्याचे गेल्या आठवड्यात उन्हाळी आवर्तन सुरू झाले आहे. पाणी बचत करण्यासाठी आणि शेतकरी हितासाठी हे आवर्तन सलगपणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी गेल्या आठवड्यात नगर येथे कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी ना. शंकरराव गडाख यांच्यासह भाजप खा. डॉ. सुजय विखे, अन्य लोकप्रतिनिधी आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत सुरूवातील आर्वतनाच्या नियोजनाचा विषय झाल्यावर खा. डॉ. विखे यांनी लगेच नेवासा तालुक्यातील कालव्यावरील अनधिकृत विनापरवाना पाण्याच्या मोटारीचा विषय उपस्थित केला. या मोटारींची संख्या 10 हजारांच्या घरात असून यामुळे कालव्यावरील शेवटच्या शेतकर्‍यांपर्यंत पाणी पोहचण्यास अडचण होत असल्याची भूमिका खा. विखे यांनी मांडली. तसेच यामुळे कालव्यास असलेला धोकाही त्यांनी निदर्शनास आणून दिला.

मात्र, यावेळी ना. गडाख यांनी याला विरोध केला होता. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. शेतकर्‍यांची पिके अंतिम टप्प्यात असून आता मोटारी बंद केल्यास नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. आधीच लॉकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक मेटाकुटीला आला असून किमान हे आर्वतन पूर्ण करावे, असा आग्रह धरला. मात्र, त्यावर खा. विखे यांनी टोकाची भूमिका घेत नेवासा तालुक्यातील पाण्याच्या मोटारी बंद करण्यासाठी थेट उपोषण करण्याचा इशारा दिला होता. यावरून ना. गडाख आणि खा. विखे यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती.

अखेर प्रशासनाने नियमावर बोट ठेवत गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यातील मोटारी बंद करण्याचा सपाटा लावला आहे. खा. विखे यांच्या भूमिकेमुळे नेवासा तालुक्यातील मोटारी बंद होणार असल्या तरी त्याचा फायदा शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील टेलच्या भागातील शेतकर्‍यांना होणार आहे. यामुळे उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील शेतकरी सुखावणार आहे.

पाण्याचा नवा सामना
पाण्यासाठी नगरच्या नेत्यांचा संघर्ष नवा नाही. प्रत्येक नेता आपल्या विभागासाठी आग्रही असतो. यावरून अनेकदा वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आता मुळा कालव्यावरील मोटारींमुळे गडाख-विखे संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत. मुळा कालव्याचे पाणी आणि नेवासा विरुद्ध शेवगाव-पाथर्डी हा संघर्ष जुनाच आहे. आता खा. विखे यांनी शेवगाव आणि पाथर्डीच्या शेतकर्‍यांची बाजू घेत उडी घेतली आहे. तर गडाख नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी भांडत आले आहेत. हा संघर्ष कोणत्या वळणावर जाणार, यावरून चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या