Thursday, November 14, 2024
Homeनगरश्रीरामपुरात चिनी मांजा विक्रेत्यांवर धडक कारवाई

श्रीरामपुरात चिनी मांजा विक्रेत्यांवर धडक कारवाई

दोघांविरुद्ध गुन्हा : नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहरात नगरपालिकेकडून चिनी मांजा विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तरीही काही व्यावसायिक मांजाची विक्री करताना आढळून आले. नगरपालिका पथकाकडून आठ व्यावसाविकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच पोलीस प्रशासनानेही दोन व्यावसायिकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पालिका व पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

- Advertisement -

यापुढेही चिनी मांजा विक्री व वापर करताना आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. पालिकेने चिनी मांजा विक्री व वापरावर बंदी घातली आहे. तरीही या मांजाची बेकायदेशीर विक्री सुरु होती. या चिनी मांजामुळे पशू, पक्षी, लहान मुले, माणसे जखमी होण्याची किंवा जीवितहानी होण्याची शक्यता आहे. चायना मांजामुळे गेल्या आठवड्यात काही मुले जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच चारपाच दिवसांपूर्वी मोरगे वस्ती भागातील आर्यन गुळवे या मुलाचा गळा चिरला. ही एवढी गंभीर घटना घडूनही शहरात चिनी मांजा विक्री सुरूच आहे.

पालिका प्रशासनाने चिनी मांजा बंदीचे आवाहन केले होते. अखेर पालिका प्रशासनाने अशा व्यावसायिकांविरुध्द कारवाईची मोहीम हाती घेतली. शहर हद्दीमध्ये चिनी मांजा विक्री करणार्‍या सनी पतंग स्टॉल-बाजार रोड, उन्हाळा पतंग स्टॉल संगमनेर रोड, अनुष्का पतंग स्टॉल संगमनेर रोड, येवले पतंग स्टॉल, संगमनेर रोड, साक्षी जनरल स्टोअर्स, नेवासा रोड, झिरंगे पतंग स्टॉल, गेंधवणी रोड, झिंगारे पतंग स्टॉल आंबेडकर कॉलनी, पांडे पतंग स्टॉल बेलापूर रोड आदी दुकानांनवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

तसेच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव यांच्या फिर्यादीवरुन सौरभ चंद्रकांत झिरंगे (रा. झिरंगे मळा, गोंधवणी) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून 600 रुपये किमतीचे प्लॅस्टिक व दोन असरी नायलॉन मांजा जप्त केला आहे. तसेच पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन पोकळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन परवेझ रफीक बागवान (वॉर्ड नं 2) याच्या दुकानातून 900 रुपये किमतीचे दोन आसरी नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. या दोघाविरोधात भा. दं. वि. कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही जप्तीची मोहीम नियमितपणे सुरूच राहणार आहे. यापुढील काळात ज्या व्यावसायिकांकडे चिनी मांजा आढळून येईल, त्याच्यावर एका आसरीपोटी एक हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सदर दुकानदार, नागरिकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येऊन कारवाई केली जाणार आहे. तरी व्यावसायिकांनी चिनी मांजाची विक्री अथवा वापर करू नये व चिनी मांजाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन शहरातील व्यावसायिकांनी पालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

युवा फ्रेंड्स ग्रुपचे निवेदन

शहरातील चिनी मांजा विक्रेते व त्याचा वापर करणार्‍यांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी, तसेच चिनी मांजा विरहित उत्सव साजरा करण्यासाठी शासकीय पातळीवरून जनजागृती करण्याबाबचे निवेदन युवा फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना देण्यात आले. या निवेदनावर युवा फ्रेंड्स ग्रुपचे अध्यक्ष विवेक माटा, सागर दुपाटी, सुरेश ठुबे, अजय धाकतोडे, सृजन कदम आदींच्या सह्या आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या