आज फायनल । ठाणे, रायगड, परभणी, मुंबई सेमीफायनलमध्ये
अहमदनगर (प्रतिनिधी)- 31 व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत यजमान नगर संघ क्वार्टर फायनलमध्ये बाहेर पडला. पुणे संघाने नगरचा पराभव करत सेमी फायनल गाठली. त्याचबरोबर ठाणे, रायगड, परभणी, मुंबई उपनगराचे संघ सेमीफायनलमध्ये पोहचले. आज सायंकाळी सेमीफायनल आणि फायनल मॅच होणार आहे. नगरच्या मुलींचा संघही बाद पध्दतीने खेळविल्या गेलेल्या साखळी सामन्यात पराभूत झाला.
अहमदनगर शहरातील रेसिडेंसियल हायस्कुलच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या किशोर गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात यजमान अहमदनगरला आज पराभवाचा धक्का बसला. पुणे संघाने नगरचा 26-19 असा पराभव करत प्रथम सेमीफायनल गाठली. राहुल वाघमारे, विशाल ताटे यांनी या विजयात चढाई-पकडीचा संयमपूर्वक खेळ करीत हा विजय साकारला. सचिन म्हसरूप, तौसिक शेख या नगरच्या खेळाडूंनी चांगली चमकदार कामिगिरी करत डावपेच टाकले.
दुसर्या सामन्यात मुंबई उपनगरने गतविजेत्या कोल्हापूरला 38-37 असे चकवीत सेमीफायनल गाठली. पूर्ण डाव चुरशीने खेळल्या या सामन्यात मध्यांतराला 16-14 अशी आघाडी कोल्हापूरकडे होती. शेवटची काही मिनिटे शिल्लक असे पर्यंत ही आघाडी राखण्यात त्यांना यश आले. 30-25 अशी कोल्हापूरकडे आघाडी असताना उनगरच्या रजतकुमार सिंगला जीवदान मिळाले.
याचा फायदा घेत रजतकुमारने आपल्या एका चढाईत कोल्हापूरचे 4 गडी टिपत व त्यानंतरच्या चढाईत लागोपाठ गुण घेत लोण देत उपनगरला विजय पथावर नेले. या विजयात आदित्य अंधारे, जयप्रकाश चौधरी, उदित यादव यांची देखील रजतला चढाई-पकडीची उत्तम साथ लाभली. कोल्हापूरच्या अथर्व महाडिक, ऋषिकेश बाबानकर, साहिल पाटील, दीपक पाटील यांचा खेळ शेवटच्या क्षणी कमी पडला.
किशोर गटात विजय मिळविताना उपनगरला कष्ट घ्यावे लागले. पण किशोरी गटात मात्र मुंबई उपनगरने सांगलीला 61-17 असे बुकलून काढत उपांत्य फेरी गाठली. पहिल्या डावात 3 लोण देत 32-07 अशी आघाडी घेणार्या उपनगरने दुसर्या डावात देखील 2 लोण देत गुणांचे अर्धशतक पार केले आणि हा सामना 44 गुणांनी आपल्या नावे केला. समृद्धी मोहिते, याशिका पुजारी या विजयाच्या शिल्पकार ठरल्या.
रायगडची मुले पराभूत झाली असली तरी किशोरी गटात रायगडने आपले आव्हान जिवंत ठेवले.
रायगडने अटीतटीच्या लढतीत ठाण्याचा प्रतिकार 42-39 असा मोडून काढला. मध्यंतराला 23-16 अशी आघाडी घेणार्या रायगडला शेवटच्या 5 मिनिटात ठाण्याने चांगलेच झुंजविले. ही पाच मिनिटे गुणफलक सतत हलत होता. कधी रायगड तर कधी ठाणे आघाडी घेताना दिसत होते. पण दोन मिनिटे असताना नंदिता वाघ हिने 2 गडी टिपत सामना रायगडच्या बाजूने झुकविला. यात तिला रश्मी पाटीलची देखील छान साथ लाभली. 5 अव्वल पकड करून देखील ठाण्याला पराभवाचा सामना करावा लागला. वैष्णवी साळुंखे, रोशनी माने यांचा खेळ ठाण्याला विजयी करण्यात थोडा कमी पडला.
ठाण्याच्या मुलांनी मात्र रत्नागिरीला 40-17 असे पराभूत करीत आपले आव्हान जिवंत ठेवले. कौस्तुभ शिंदे, सचिन प्रजापती यांच्या चतुरस्त्र खेळाला या मोठ्या विजयाचे श्रेय जाते. रत्नागिरीचा शुभम शिंदे बरा खेळला. कोल्हापूरची मुलांचे आव्हान संपुष्टात आले असले तरी कोल्हापूरच्या मुलींनी सिंधुदुर्गला 43-31 असे पराभूत करीत आपल्या आशा कायम राखल्या.
पूर्वार्धात अंकिता चेचर, अनुराधा पाटील, ऋतुजा अवघडी, अनुराधा निकम यांच्या चढाई- पकडीच्या खेळामुळे एकतर्फी चालल्या या सामन्यात 25-14 अशी कोल्हापूरने आघाडी राखली होती. पण उत्तरार्धात समृद्धी भगत, प्रज्ञा शेट्ये, ऊर्जा साळगावकर यांनी आपला खेळ उंचावत सामन्यातील चुरस वाढविली. पण संघला विजय मिळवून देण्यात त्या कमी पडल्या.
परभणीचे मुलं-मुली भारीच
परभणीने बलाढ्य पुण्याचा 45-28 असा सहज पाडाव करीत किशोरी गटात सेमीफायनलमध्ये धडक दिली. पहिल्या डावात एक लोण देत 18-14 अशी आघाडी घेणार्या परभणीने दुसर्या डावात देखील दोन लोण देत पुण्याच्या गोटातील हवाच काढून घेतली. गौरी डाहे, निकिता लंगोरे यांचा चढाई- पकडीचा खेळ या विजयात महत्वपूर्ण ठरला. झुव्हेरिया पिंजारी पुण्याकडून एकाकी लढली.
परभणीच्या मुली विजय मिळवीत असताना मुले तरी कसे मागे रहातील. परभणीने किशोर गटात मध्यांतरातील 10-16 अशी 6 गुणांची पिछाडी भरून काढत रायगडला 36-25 असे नमवित उपांत्य फेरीत धडक दिली. चंद्रकांत फसाळे, आकाश शिंदे यांनी आक्रमक सुरवात करीत परभणीवर लोण देत विश्रांतीला 6 गुणांची आघाडी घेतली. पण उत्तरार्धात त्यांना ती टिकविता आली नाही. उत्तरार्धात परभणीच्या अजय व अजिंक्य या मंडले बंधूनी जोरदार कमबँक करीत रायगडवर दोन लोण चढविले आणि 11 गुणांच्या मोठ्या फरकाने सामना आपल्या बाजूने झुकविला.