14 सभापती अन् सहा झेडपी सदस्य होणार विषय समिती सदस्य
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषषदेच्या अर्थ आणि बांधकाम समितीच्या सभापतिपदाचा पदभार सोपविण्यासाठी उद्या (दि.27) जिल्हा परिषदेची विशेष सभा होत आहे. याच सभेत माजी पदाधिकार्यांसह नव्याने पंचायत समितीचे सभापती म्हणून पदभार स्वीकारलेल्या 14 सभापतींची विविध विषय समितीत सदस्य म्हणून निवड करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी विशेष सभा होत आहे. यात सभापती म्हणून नियुक्त झालेले सुनील गडाख आणि काशिनाथ दाते यांच्याकडे बांधकाम आणि कृषी समितीचा पदभार सोपविण्यात येणार आहे. आतापर्यंत झालेल्या चर्चेत गडाख यांच्या वाट्याला अर्थ आणि बांधकाम समिती तर दाते यांच्याकडे कृषी समितीचा पदभार सोपविण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.
याच सोबत माजी अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील, सभापती कैलास वाकचौरे, सभापती अजय फटांगरे, सभापती अनुराधा नागवडे यांची देखील रिक्त होणार्या विषय समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात येणार आहे. तसेच नव्याने पंचायत समितीचे सभापती झालेल्यांनाही जिल्हा परिषदेच्या विषय समितीत सदस्य म्हणून स्थान देण्यात येणार आहे. यामुळे उद्याच्या सभेत नवीन दोन सभापतींकडे त्यांच्या वाट्याला येणार्या समितीचा पदभार आणि अन्य चार माजी सभापतींना विषय समितीत समावून घेण्यात येणार आहे.
विखे स्थायी समितीत
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनीताई विखे यांना कोणत्या विषय समितीत स्थान द्यावयाचे याबाबत नियम नाही. मात्र, आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रोटोकॉलनूसार माजी अध्यक्षांना स्थायी समितीत स्थान दिलेले आहे. विखे या तीनवेळा अध्यक्षा राहिलेल्या असल्याने त्या ज्येष्ठ आहेत. यामुळे त्यांना स्थायी समितीत संधी मिळण्याची शक्यता आहे. यासह माजी सभापती कैलास वाकचौेरे यांना जलव्यवस्थापन तर माजी सभापती अजय फटांगरे आणि अनुराधा नागवडे यांची निवड अर्थ समितीच्या सदस्यपदी होण्याची शक्यता आहे. असे असले तरी अंतिम अधिकार अध्यक्ष आणि सभागृहाचा राहणार आहे. वेळ पडल्यास यासाठी मतदानाची तरतूद आहे.