Friday, May 31, 2024
Homeनगरकरोना बाधितच्या मृत्यूप्रकरणी तहसीलदारांची करोना सुरक्षा समितीला नोटीस

करोना बाधितच्या मृत्यूप्रकरणी तहसीलदारांची करोना सुरक्षा समितीला नोटीस

आरोग्य विभागासह, सरपंच, तलाठी, ग्रामसेवकांवर निष्काळजीपणाचा ठपका

वडनेर (वार्ताहर)- पारनेर तालुक्यातील निघोज येथील करोनाबाधीत युवकाच्या मृत्युप्रकरणी हलगर्जीपणा केल्या प्रकरणी पिंप्रीजलसेन येथील करोना सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा सरपंच यांच्यासह अधिकार्‍यांना पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी नोटीस दिली आहे.

- Advertisement -

तालुक्यातील निघोज येथील रहिवासी आणि पिंपरीजलसेन याठिकाणी क्वारंटाईन केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामुळे तहसीलदार देवरे यांनी पिंप्रीजलसेनच्या सरपंच तथा करोना सुरक्षा समितीच्या अध्यक्षा शेउबाई घेमुड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, निघोज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.स्मिता म्हस्के, ग्रामसेवक एस.बी दुधाडे, कामगार तलाठी आशिर्वाद घोरपडे, कृषी सहाय्यक श्रीमती गावडे यांना या नोटिसा बजावल्या आहेत.

3 तारखेला मयत युवक हा घाटकोपर येथून पिंप्रीजलसेन येथे पत्नी, मुलगा आणि मुलगी यांना घेऊन सासुरवाडीत मुक्कामी आला होता. त्याची कोणतीच नोंद अथवा त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले नाही. तसेच बाहेरची व्यक्ती पिंप्रीजलसेन या ठिकाणी सासूरवाडीला येवून त्या गावाच्या परिसरात फिरत असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या दुर्लक्षाला गावातील करोना सुरक्षा समीतीचे अध्यक्ष तथा सरपंच, कामगार तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक कारणीभूत आहेत. त्यांनी या युवकाची दखल घेतली असती तर हा प्रसंग टाळता आला असता.

तसेच संबंधित युवक निघोज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेला, त्यावेळी त्याची तपासणी केली आणि तो करोना संशयित आहे, याची जाणीव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता म्हस्के यांना झाली. त्यावेळी त्यांनी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश लाळगे यांनी संबंधित युवकाला तातडीने नगरच्या शासकीय रुग्णालयात पाठविणे आवश्यक होते आणि याबाबतची माहिती तालुका प्रशासनाला देणे गरजेचे होते.

या प्रकरणात आपत्ती व्यवस्थापनामध्ये हलगर्जीपणा झाला आहे. संबंधित मयत युवकाने स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत हलगर्जीपणा केला. तर करोना ग्रामसुरक्षा समितीने आणि आरोग्य विभागाने देखील आपले कर्तव्य बजावताना या युवकाकडे दुर्लक्ष केले. यामुळे तालुक्यात करोना बाधित युवकाचा मृत्यू झाल्याचा ठपका नोटीसद्वारे तहसीलदार देवरे यांनी संबंधितांवर ठेवला आहे.

आता तहसीलदार यांच्या नोटीसला संबंधित काय उत्तर देणार आणि त्यानंतर काय कारवाई होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. पिंप्रीजलसेनच्या घटनेमुळे तालुका हादरला असून सर्व शासकीय विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

55 दिवसांपासून नागरिकांचे हाल
तीन दिवसांपासून निघोज पठारवाडी, चिंचोली, पिंप्रीजलसेन येथील सर्व व्यवहार बंद असून गावागावांतील सीमा बंद करून निघोजमधील जुनी पेठ बंद करण्यात आली आहे. तब्बल 55 दिवस लॉकडाउनमुळे रोजंदारी मजूर, हातावर पोट असणारे छोटे व्यवसायिक मोठे व्यावसायीक यांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे.

नगर जिल्ह्यात श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी आणि अन्य तालुक्यातही हलगर्जीपणाच्या घटना घडल्या आहेत. पुणे, मुंबई शिकणारे, नोकरी करणारे अनेक तरून गावांत दाखल झाले. पण मोठ्या घरातील तरूणांना क्वारंटाइन न करता गावात फिरण्याची मुभा दिली जात आहे. काहींच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारण्याची तसदी घेतली जात नाही. एव्हाना पोलिसही कसून चौकशी करतात. पण मोठ्या प्रमाणात बाहेर जिल्ह्यातून लोक गावांकडे कसे येतात हा प्रश्नही अनेकांना सतावू लागला आहे. स्थानिक कमिट्यांवर जबाबदारी असतानाही करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे निदान यापुढेतरी गाव कमिट्यांनी गावात राजकारण न करता जबाबदारीचे भान ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या