Saturday, May 18, 2024
Homeनगरकरोना योध्द्यांमुळे श्रीरामपूर तालुका करोनापासून दूर !

करोना योध्द्यांमुळे श्रीरामपूर तालुका करोनापासून दूर !

श्रीरामपूर तालुक्यात 501 जण क्कॉरंटाइन; प्रशासन उपाययोजनेबाबत सतर्क

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात आरोग्य विभागाकडून सर्वातोपरी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे तालुका अद्यापही ‘करोना’ पासून दूर आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्यात कालअखेर शहरी भागात इन्स्टिट्युशनल 41 तर ग्रामसुरक्षा समिती अंतर्गत 460 अशा सुमारे 501 जणांना क्कारंटाइन करून विलगीकरण करण्यात आलेले आहे.

- Advertisement -

करोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड दोन महिन्यांपासून लॉकडाऊन करण्यात आहे. अत्यावश्यक सेवा सुविधा वगळता सर्व बंदचे आदेश आहेत. त्यामुळे या कालावधीत करोना संसर्गापासून नागरिकांचा बचाव व्हावा या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर आरोग्य विभागही सतर्क राहून काम करत असून नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम करत आहे. तर महसूल, पोलीस प्रशासनही आपले कार्य बजावत असल्याने या करोना योध्द्यांमुळे तालुका करोनापासून दूर आहे.

तालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्र व 30 उपकेंद्रांमार्फत तालुक्यात आरोग्य सुविधा पुरविली जात आहे. आरोग्य कर्मचार्‍यांसह ग्रामीण भागातील ग्रामपंचायत पातळीवर देखील करोना संकटकाळात बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांची नोंद घेतली जात आहे. त्या पार्श्वभूमीवरच ग्रामसुरक्षा समिती अंतर्गत विलगीकरण कक्षाची उभारणी करण्यात आलेली आहे. तालुक्यात कालखेर ग्रामसुरक्षा समिती अंतर्गत उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात 460 जणांना क्कॉरंटाइन करण्यात आले असून त्यांची देखभाल केली जात आहे. तर शहरी भागात श्रीरामपुरातील समाज कल्याण आंबेडकर वसतिगृह येथे व वाकडी रोडवील मंगल कार्यालयात 41 जणांना क्कारंटाइन करण्यात आले आहे.

अशी माहिती पंचायत समितीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे व पं.स. आरोग्य सहाय्यक त्रिंबक बाचल, आरोग्य पर्यवेक्षक श्री. कुंभार यांनी दिली. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विलगीकरण कक्षात ठेवलेल्या नागरिकांचा क्कारंटाइनचा कालावधी पूर्ण झाला आहे. तरी देखील सुरक्षा म्हणून त्यानंतर त्यांना होम क्कारंटाइन करण्यात आलेले आहे. गावपातळीवर ग्रामपंचायतीमार्फत आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. या कामात अंगणवाडी सेविका, आशा सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी कार्य करत आहेत. नागरिकांनीही करोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी शासन नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, शासनाने नियम व अटी घालून श्रीरामपूर शहराची बाजारपेठ खुली केली होती. मात्र व्यावसायिक व नागरिकांमधून शासन नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आल्याने तहसीलदार प्रशांत पाटील यांनी बाजारपेठ बंद करण्याचे आदेश दिले. तर शहरातील जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंदचे आदेश दिले असून आदेश मोडणार्‍याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, शासन नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या