कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)- कोपरगाव येथून ममदापूर, तालुका राहाता येथे कत्तलीसाठी घेऊन जाणारी सहा जनावरे कोपरगाव शहर पोलिसांनी बेट नाका येथे पकडली तसेच जनावरांची अवैध वाहतूक करणारा चालक व आरोपी शाहरुख अन्वर शहा रा. ममदापूर याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर सोमवारी रात्री पोलीस स्टेशनला असताना त्यांना खबर्याकडून माहिती मिळाली, कोपरगाव येथून कत्तलीसाठी काही जनावरे मॅक्स पिकअपमध्ये भरून ममदापूर, ता.राहाता येथे नेत आहेत. त्यानी कोपरगाव ते पुणतांबा फाटा रोडवर व बेट नाका कोपरगाव रोडवर नाकाबंदी केली असता मॅक्स पिकअप नं. चक 04 एङ 832 मिळून आली. त्या वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनामध्ये सहा बैल भरून निर्दयीपणे व सदर बैलांना वेदना होतील अशा पध्दतीने विनापरवाना वाहतूक करताना कत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना मिळून आले.
याप्रकरणी आरोपी शाहरुख अन्वर शहा याला मॅक्स पिकअप व्हॅन व सहा बैल यासह दोन लाख 99 हजारांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली. या प्रकरणी पोकाँ अंबादास रामनाथ वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5,9 व प्राण्यास निर्दयपणे वागवीणे कलम 11(1)(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. ए. एम. दारकुंडे करीत आहेत.