गोणेगावच्या 8 जणांवर गुन्हा दाखल
नेवासा (तालुका प्रतिनिधी)- तलवार गळ्याला लावून बळजबरीने विषारी पदार्थ पाजण्याचा प्रयत्न करणार्या गोणेगाव (ता.नेवासा) येथील 8 जणांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणेश वसंत रोडे (वय 29) रा. गोणेगाव ता. नेवासा यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, 15 मे रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास मी माझ्या घरी असताना माझे भाऊबंद भाऊसाहेब पंढरीनाथ रोडे व विठ्ठल नामदेव शेटे यांचे भांडण झाले समजले.
भाऊसाहेब रोडे यांना शेटेच्या लोकांनी मारहाण केल्याने त्यांना नेवासा येथे दवाखान्यात नेल्याने मी नेवासाफाटा येथे दवाखान्यात गेलो असता भाऊसाहेब रोडे यांच्या खांद्याला मार लागला होता. त्यांना डॉक्टरांनी नगर येथे उपचारासाठी जाण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी मला घरी जाऊन ड्रायव्हर पाहून आमच्या घराजवळचे कांदे ट्रकमध्ये भरून दे असे सांगितल्याने मी सोपान फोपसे यास घेऊन गेलो व वस्तीवरून कांदे ट्रॅक्टरमध्ये गावात घेऊन आलो. मराठी शाळेजवळ ट्रक उभा होता.
तिथे एक ट्रिप करून पुन्हा ट्रॅक्टरमध्ये कांदे घेऊन जात असताना मी ट्रॉलीवर बसलो होतो, त्यावेळी 7 ते 7:30 वाजेच्या सुमारास मी भारत नामदेव शेटे यांच्या घराजवळ आल्यावर मला तेथे कुलदीप विठ्ठल शेटे, संतोष विश्वनाथ शेटे, सागर भारत शेटे, अविनाश विठ्ठल शेटे, आकाश भारत शेटे, भारत नामदेव शेटे, विठ्ठल नामदेव शेटे, विश्वनाथ नामदेव शेटे (सर्व रा.गोणेगाव. ता.नेवासा) हे एकत्र जमा होऊन आले.
यामधील अविनाश, भारत, आकाश, यांनी मला ट्रॉलीतून खाली ओढले व आमच्या घराजवळून ट्रेलर कसा काय घेऊन चालला? असे म्हणत नारळाच्या ताटीजवळून राजू शेटेच्या घराकडे ओढत नेले. तिथे कापूस ठेवलेल्या खोलीत मला दाबून धरून संतोष शेटे याने त्यांच्या जवळील तलवार माझ्या गळ्याला लावली. आकाश शेटे व भारत शेटे यांनी माझे हात तर विश्वनाथ शेटे याने पाय धरले. त्यावेळी विठ्ठल शेटे व अविनाश शेटे यांनी ड्रममधील विषारी पदार्थ मला पाजण्याचा प्रयत्न केला. मी पदार्थ तोंडात न जाऊ देता पूर्ण ताकतीने हाताला झटका मारला असता पदार्थ माझ्या कपड्यावर पडला.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.तेवढ्यात पोलीस पोलीस अशी आरडाओरड केल्याने अविनाश याने मला कापसाच्या ढिगावर लोटले व शेजारी तलवार टाकली व तुला चार महिने जेलमध्ये सडवतो असे म्हणत रूमला बाहेरून कडी लावली.त्यानंतर पोलीस आल्यानंतर सदर हकीगत त्यांना सांगितली. त्यानंतर जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे उपचार घेऊन बरे वाटत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध आर्म अॅक्ट व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर करत आहेत.