नवी दिल्ली – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू झालेल्या हिंसाचारात दिल्ली धगधगत आहे. हिंसाचारातील मृतांचा आकडा 22 वर पोहोचला आहे. बुधवारी 4 मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत. यात आयबी या गुप्तचर यंत्रणेच्या एका कर्मचार्याचाही समावेश आहे. अंकित शर्मा असे या कर्मचार्याचे नाव आहे. अंकित यांचा मृतदेह दंगलग्रस्त चांदबाग परिसरात आढळला. अकिंत यांच्या डोक्यावर तलवारीचे वार आढळल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. मृतदेहावर चाकूचेही वार आहेत.
नाल्यामध्ये त्यांचा मृतदेह दगडाखाली दाबून ठेवण्यात आला होता. अंकित हे हरवले असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत केली होती. अंकित हे चांदबाद परिसरातील रहिवासी असून कदाचित त्यांचा दगडफेकीत मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिस व्यक्त करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या पूर्वी दिल्ली पोलिसांनी आपले हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांना गमावले आहे.
सीएए विरोधी आंदोलनादरम्यान दिल्लीतील हिंसाचारात रतनलाल यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू दगड लागल्याने नव्हे, तर गोळी लागल्याने झाल्याचा खुलासा शवविच्छेदन अहवालातून करण्यात आला आहे. रतनलाल यांच्या डाव्या खांद्यात शिरलेली गोळी उजव्या खांद्यापर्यंत पोहोचली होती, असे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट केले आहे. शहीद रतनलाल एसीपी गोकुळपुरी ऑफिसमध्ये तैनात होते. चांदबाग पुलया येथील एका नाल्यातून तयांचा मृतदेह मंगळवारी संध्याकाळी बाहेर काढण्यात आला.
दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर-बाबरपूर आणि चांदबागेत सुरू असलेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 22 वर पोहोचली आहे. तर, या हिंसाचारात सुमारे 200 लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पोलिस दलातील जवानाचाही समावेश आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या 24 तासांमध्ये 3 बैठका घेतल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून उत्तर पूर्व दिल्लीतील मौजपूर, जाफराबाद, भजनपुरा, कबीर नगर, सीलमपूर या भागात आज तणावपूर्ण शांतता आहे.
पंतप्रधान मोदींनी केले शांततेचे आवाहन
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. बंधु आणि भगिणींनो दिल्लीत शांतता ठेवा. आणि आपसात बंधुभाव जोपासा. लवकरात लवकर शांतता प्रस्थापित होणं गरजेचं आहे, असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलंय.
हिंसाचाराला शाह जबाबबदार – सोनिया गांधी
दिल्लीतील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट असून दिल्लीत उद्भवलेल्या स्थितीला केंद्र सरकार, गृहमंत्री अमित शहा जबाबदार असून ही जबाबदारी स्वीकारत गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. दिल्लीत शांतता राखण्यात दिल्लीचे मुख्यमंत्रीही अयशस्वी ठरले आहेत. त्यांनी जबाबदारी न घेतल्यानेच दिल्लीत अशी स्थिती झाल्याचे सांगत सोनिया गांधी यांनी केंद्र सरकार, गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेस पक्षाच्या कार्यसमितीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सोनिया गांधी बोलत होत्या.
लष्काराला बोलवा : अरविंद केजरीवाल
दिल्लीचे मुख्यंत्री अरविंद केजरीवाल यांनी लष्कराला पाचारण करण्याची मागणी केली आहे. दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्काराला बोलवा, तरच लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल. कारण पूर्ण प्रयत्न करुनही दिल्ली पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणता येत नाही आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.आता लष्कराला बोलावण्याची वेळ आली असून, हिंसाचारग्रस्त भागांमध्ये संचारबंदी लागू करण्याची आवश्यकता आहेफ असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे. गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून त्यांच्याकडे सुद्धा लष्काराला बोलावण्याची मागणी करणार आहोत, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.