जामीनदाराची पोलिसांकडे फौजदारी कारवाईसाठी तक्रार
अहमदनगर (प्रतिनिधी) – अर्बन बँकेच्या केडगाव शाखेतून प्रिंटिंग व्यवसायासाठी तीन कोटींचे कर्ज बनावट कागदपत्र आणि तोतया जामीनदाराच्या आधारे दिल्याचे उघडकीस आले आहे. हे कर्ज मंजूर करण्यासाठी गहाण ठेवलेल्या जमिनीचे मालक जयंत मोहनीराज वाघ यांनी फौजदारी कारवाईसाठी पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे.
नगर अर्बन बँकेच्या केडगाव शाखेने मे. मंत्रा प्रिंटर्सचे चैतन्य रघुनाथ कुलकर्णी यांना प्रिंटिंग व्यवसायासाठी 16 जुलैला तीन कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. या कर्जासाठी जयंत मोहनीराज वाघ (मूळ रा. बुरूडगल्ली, माळीवाडा, हल्ली रा. मार्कंडेय हाऊसिंग सोसायटी, गुलमोहर रस्ता, सावेडी) यांची केडगाव उपनगरातील जमीन गहाणखताद्वारे तारण ठेवली आहे. या कर्जाचे हप्ते थकल्याने जामीनदार जयंत वाघ यांना नोटीस आल्यावर त्यांना त्यांची जमीन गहाण ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ बँकेच्या अधिकार्यांशी संपर्क करून आपण या कर्जासाठी जामीनदार नसल्याचे व जमीन गहाणखताद्वारे दिली नसल्याची लेखी तक्रार केली होती.
या तक्रारीवर कारवाई न झाल्याने वाघ यांनी पोलीस प्रशासन, रिझर्व्ह बँक यांच्याकडे निवेदन पाठविले आहे.