Wednesday, May 29, 2024
Homeनगरउद्योजकाची 5 कोटी 80 लाखांची फसवणूक

उद्योजकाची 5 कोटी 80 लाखांची फसवणूक

मुंबईच्या पाच जणांविरुद्ध नगरमध्ये गुन्हा दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी)- बाहेर देशातून मागविलेल्या कच्च्या मालाच्या जीएसटी, कस्टम ड्युटीच्या मोबदल्यात अनावश्यक रक्कम घेऊन पाच जणांनी नगरमधील उद्योजकांची पाच कोटी 80 लाख 83 हजार 850 रुपयांची फसवणूक केल्याची घटना 1 जून 2017 ते 15 मार्च 2019 दरम्यान नगर येथील एमआयडीसी मधील जे.एम. इंडस्ट्रीज येथे घडली.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी, निखिलेंद्र मोतिलाल लोढा (वय- 52 रा. माणिकनगर) यांची एमआयडीसी येथे जे.एम. इंडस्ट्रीज कंपनी आहे. या कंपनी करिता लागणारा अ‍ॅल्युमिनियमचा कच्चा माल ईशकृपा शिपिंग अँड लॉजिस्टक प्रायव्हेट लिमिटेड खारघर मुंबई या कंपनीद्वारे बाहेरच्या देशातून मागविला जातो. या कंपनीचे संचालक नवनाथ नारायण गोळे (रा.खोपोली, रायगड), आणि लतादेवी यशवंत कांबळे (रा. जुईनगर, मुंबई) यांनी मुंबई, मलेशिया, सिंगापूर या बाहेरील देशांतून जे. एम. इंडस्ट्रीज कंपनीसाठी लागणारा अ‍ॅल्युमिनियमचा कच्चा माल आयात केला.

माल मुंबई येथील नाव्हाशेवा बंदरावर उतरून घेतला आणि लोढा यांना सदर माल कस्टममध्ये अडकला आहे असे सांगून कस्टम ड्यूटी, जीएसटी व कामाचा मोबदला असे म्हणून त्यांच्याकडून वेळोवेळी 27 कोटी 26 लाख 39 हजार 807 इतकी रक्कम आरटीजीएस द्वारे स्वीकारली परंतु लोढा यांनी जून 2017 ते मार्च 2019 या कालावधीत त्यांनी मागविलेल्या कच्च्या मालाची कस्टम ड्यूटी, जीएसटी तपासले असता सदर रक्कम ही 21 कोटी 16 लाख 39 हजार 860 रुपये इतकी असल्याचे निदर्शनास आले.

नवनाथ गोळे व लतादेवी कांबळे यांनी संतोष कांबळे, दत्ता (पूर्ण नाव माहिती नाही), निशा कुमकर (सर्व रा. मुंबई) यांच्या मदतीने लोढा यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी करून पाच कोटी 80 लाख 83 हजार 850 रुपये इतकी रक्कम जादा स्वीकारून लोढा यांची फसवणूक केली. लोढा यांना ज्यादा दिलेल्या रकमेची मागणी केली असता त्यांना रक्कम देण्यास नकार दिला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवन सुपनर करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या