सहा हजार लिटर रसायनासह 14 लाखांचा मुद्देमाल जप्त
अहमदनगर (प्रतिनिधी) – नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभुमीवर कारवाईसाठी नियुक्त केलेल्या राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने पहिली कारवाई बुधवारी (दि. 25) पारनेर तालुक्यात केली. या कारवाईमध्ये सहा हजार लिटर रसायनासह 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गव्हाणेवाडी, दाणेवाडी येथे हातभट्टी निर्मिती केंद्राची माहिती या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने दोन्ही ठिकाणासह वाळवणे, टाकळी ढोकेश्वर येथे अवैध देशी-विदेशी मद्याची वाहन तपासणी सुरू केली. दारुबंदीचे सात गुन्हे पथकाने दाखल केले आहेत.
संजय मारुती कार्ले, आप्पासाहेब मारुतराव काळे व सुनिल हनुमंत दाते या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून देशी-विदेशी मद्य, हातभट्टी गावठी दारू आणि दारू वाहतुकीसाठी वापरलेली स्कॉर्पिओ जीप, हुंदाई कंपनीची वेरना कार, दोन चारचाकी वाहने व एक टिव्हीएस कंपनीची ज्युपीटर स्कुटर जप्त करण्यात आले आहे. 14 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कारवाईत पोलिसांनी 5 हजार 700 लिटर रसायन जप्त केले.