Saturday, May 25, 2024
Homeनगरकरोनामुळे शेती क्षेत्राची परवड; शेतमाल मातीमोल !

करोनामुळे शेती क्षेत्राची परवड; शेतमाल मातीमोल !

आगामी खरीप हंगामासाठी शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात !

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- करोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे शेती उत्पादनासह शेतीपुरक उत्पादनांचीही परवड झाल्याने शेतमाल मातीमोल भावात विकावा लागत आहे. करोनाचा सर्वात मोठा फटका शेती क्षेत्राला बसला आहे. शेतमाल तयार होऊनही लॉकडाऊनचे कारण पुढे करून मातीमोल भावाने खरेदी होत आसल्याने शेतकर्‍यांना उत्पादन खर्चा इतकाही मोबदला मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आगामी खरीप हंगामासाठी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

- Advertisement -

भारत हा कृषीप्रधान देश असल्याने भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राला मोठे महत्त्व आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कृषी क्षेत्राची सातत्याने कोसळत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठी अवकळा झाली आहे. गेला खरीप हंगाम अतिवृष्टीने पाण्यात गेला होता. काढणीस आलेली पिके पाण्याखाली गेल्याने शेतकर्‍यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे रब्बी हंगामाच्या तयारीसाठी शेतकर्‍यांना मोठी कसरत करावी लागली होती. कसाबसा रब्बी हंगाम उभारून पिके काढणीला आलेली असतानाच करोना विषाणूच्या प्रादुर्भावाने देश लॉकडाऊन झाल्याने शेती व शेतीपुरक व्यवसायही लॉकडाऊन झाल्याने शेतकर्‍यांना सलग आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

जानेवारी 2020 पासून जगभर करोना विषाणूने थैमान घातले. त्याचा फटका भारतालाही बसलेला आहे. करोनाला प्रतिबंध घालण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आल्याने संपूर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत. रब्बी हंगामी पिके काढण्याचा हा सुगीचा हंगाम असल्याने करोनाचा सर्वात जास्त फटका कृषी व कृषी पुरक व्यवसायाला बसलेला आहे. पोल्ट्री व्यवसायाला प्रथम मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे अंडी व मांसल कोंबडी उत्पादन करणार्‍या या शेतीपुरक व्यवसायाला चांगलाच फटका बसलेला आहे. अंडी मातीमोल भावाने विक्री होत असल्याने उत्पादन खर्चही वसूल होत नाही.

तीच परीस्थिती मांसल कोंबडी व्यवसायाची झाली आहे. बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाला व फळाच्या शेतीचीही अवकळा झाली आहे. द्राक्ष, टरबूज, खरबूज, आंबा या फळ पिकांची विक्री होत नसल्याने शेतातच सडून जात आहेत. शहरातील बाजारपेठेत ही फळे विक्रीसाठी पाठवण्यासाठी वाहतूक व्यवस्था बंद असल्याने स्थानिक बाजारपेठेत मागणीपेक्षा पुरवठा जास्त होत असल्याने मातीमोल भावाने विक्री करावी लागत आहे. तीच परिस्थिती कांद्याची झाली आहे. बराच कांदा शेतात पडून आहे.

कांदा काढण्यासाठी मजुरीचे भाव वाढल्याने व विक्री करताना उत्पादन खर्चाचा मेळ बसत नसल्याने काही शेतकर्‍यांनी कांदा थेट शेतातच गाडून टाकला आहे. मका पिकालाही मागणी नसल्याने भाव गडगडलेले आहेत. लॉकडाऊन सुरू असल्याने मजुरीचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे वाढलेला उत्पादन खर्च व उत्पन्नाचा मेळ बसत नसल्याने करोनामुळे शेती व शेतीपुरक व्यवसायाला फार मोठा फटका बसला आहे. हा फटका सहन करून येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला खरीप हंगाम उभा करण्यासाठी शेतकर्‍यांची पुन्हा एकदा फरपट होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या