आर्थिक गुन्हे शाखा मागावर; जामीन फेटाळल्याने अडचणीत वाढ
अहमदनगर (प्रतिनिधी) – शहर बँकेच्या बोगस कर्जप्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ. निलेश शेळके याच्या शोधात अहमदनगर जिल्हा पोलीस दलाची आर्थिक गुन्हे शाखा लागली आहे. सर्वोेच्च न्यायालयाने डॉ. शेळके याचा जामीन फेटाळत सोमवारपर्यंत (दि. 27) पोलिसांसमोर हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु डॉ. शेळके हजर झाले नसल्याने आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस त्यांच्या मागावर आहेत. शाखेच्या उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी त्यानुसार पथकाला तपासाच्या सूचना दिल्या आहेत.
डॉ. निलेश शेळके याने जामिनासाठी जिल्हा न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत धडपड केली. परंतु तिन्ही न्यायालयांनी बोगस कर्जप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. शेळके याचा जामीन फेटाळला. यामुळे डॉ. शेळके याच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. याचबरोबर शहर बँकेच्या संचालकांच्या अडचणीतही वाढ होण्याची चिन्हे आहेत. डॉ. निलेश शेळके नेमका कोठे लपून बसला आहे, याचा शोध घेतला जात असल्याचे आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांकडून सांगण्यात आले. उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी डॉ. शेळके पसार झाला असल्याचे सांगितले. परंतु त्याचा शोध घेतला जाईल, असेही सांगितले.
एम्स हॉस्पिटलची उभारणी करताना डॉ. निलेश शेळके याने अनेक डॉक्टरांचा विश्वास संपादन करून त्यांना हॉस्पिटलमध्ये भागीदार करून घेतले. त्यानंतर शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला हाताशी धरून संबंधित डॉक्टरांच्या नावाने कर्ज घेत त्या रकमेचा अपहार केला. याप्रकरणी दोन महिलांसह एकूण तीन डॉक्टरांनी प्रत्येकी पाच कोटी 75 लाख रुपयांची फसवणुकीची फिर्याद दिली आहे. डॉ. रोहिणी सिनारे, उज्ज्वला कवडे, डॉ. श्रीखंडे यांनी फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीनुसार डॉ. निलेश शेळके याच्यासह शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळ व अधिकार्यांविरुद्ध फसवणूक व आर्थिक अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी सुरू आहे. मुख्य सूत्रधार डॉ. निलेश शेळके यांच्यासह मधुकर वाघमारे, विजय मर्दा, योगेश मालपाणी, जगदीश कदम, कराचीवाला, मुकुंद घैसास (मयत), अशोक कानडे, सुनील फळे, रावसाहेब अनभुले (मयत), सुभाष गुंदेचा, सतीश अडगटला, मच्छिंद्र क्षेत्रे, गिरीश घैसास, डॉ. विजयकुमार भंडारी, सुजित बेडेकर, शिवाजी कदम, लक्ष्मण वाडेकर (मयत), रेश्मा आठरे, निलिमा पोतदार, बाळासाहेब राऊत, संजय मुळे, दिनकर कुलकर्णी, जवाहर कटारिया, बी. पी. भागवत यांच्यावरही गुन्हा दाखल आहे.
शेळकेचे जामीनदारही धास्तावले…
डॉ. शेळके याने शहर बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर या कर्जासाठी जामीन राहिलेल्या अनेकांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. डॉ. शेळके यांना अटक करून त्याच्या संपत्तीची चौकशी करावी या मागणीसाठी बुधवारी काही जामीनदारांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांची भेट घेतल्याचे समजते. डॉ. शेळकेच्या कर्जाचा धसका जामीनदारांनी घेतला आहे. डॉ. शेळके यांच्या मागावर आम्ही आहोत त्याला लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे निरीक्षक पवार यांनी जामिनदारांना सांगितले आहे.