नेवासा (का. प्रतिनिधी) – येथील कृषिउत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये एकाच आठवड्यात कांद्याच्या भावात जवळपास निम्म्याने घसरण झाली असून काल जास्तीतजास्त भाव अवघा 2800 रुपये प्रतिक्विंटल निघाला असून त्यामुळे शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत आहे.
घोडेगावात गेल्या सोमवारी कांद्याला प्रतिक्विंटल 5 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. बुधवारी त्यात 200 रुपयांनी घसरण होऊन भाव 4800 रुपये निघाला होता. शनिवारी त्यात1600 रुपयांनी घसरण होवून भाव 3200 रुपयांपर्यंत निघाला होता. काल सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भावात आणखी 400 रुपयांची घसरण होऊन जास्तीतजास्त भाव केवळ 2800 रुपये प्रतिक्विंटलने निघाले. एकाच आठवड्यात एवढी मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक चिंतेत आहेत.
काल एक नंबरच्या कांद्याला 2500 ते 2800 रुपये भाव मिळाला. दोन नंबरला 2000 ते 2500 रुपये, तीन नंबरला 500 ते 1000 रुपये भाव मिळाला. गोल्टी काद्याला 1500 ते 2000 रुपयांपर्यंत भाव निघाला तर जोड कांद्याला 1000 ते 1200 रुपयांपर्यंत भाव मिळाला.
किमान भाव 5 रुपये किलो !
उच्च दर्जाच्या कांद्याच्या भावात निम्म्याने घसरण झाली. तशी ती कमी दर्जाच्या भावातही झाली असून किमान कांद्याचे दर 500 रुपये प्रतिक्विंटल निघाले म्हणजे कांद्याचा भाव 5 रुपये किलोवर आला आहे. कांद्याचे भाव असेच राहिल्यास लवकरच किरकोळ बाजारात कांदा दहा रुपये किलोने मिळू शकतो.