Saturday, May 4, 2024
Homeनगरकोपरगाव : धोत्रे येथील 14 वर्षीय मुलगी करोना बाधित

कोपरगाव : धोत्रे येथील 14 वर्षीय मुलगी करोना बाधित

महिला डॉक्टरच्या संपर्कातील 15 जण निगेटिव्ह

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)- शनिवारी कोपरगाव येथील करोना बाधित डॉक्टर महिलेच्या संपर्कातील 15 व्यक्तींचे व तालुक्यातील धोत्रे येथे ठाण्याहून आलेल्या 2 मुलीचे असे एकूण 17 स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सर्वच 17 अहवाल रविवारी प्राप्त झाले असून धोत्रे येथील 14 वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर डॉक्टर महिलेच्या संपर्कातील 15 व्यक्तींचे व धोत्रे येथील एक असे एकूण 16 अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौदर यांनी दिली.

- Advertisement -

धोत्रे येथील बाधित झालेली मुलगी मागील आठवड्यात ठाणे येथून आपल्या बहिणीसह आजोबा सोबत धोत्रे येथे आली होती. त्यांना गावातील शाळेत संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र ठाणे येथे या मुलींचे वडील करोना बाधित झाल्याने प्रशासनाने तत्काळ या मुलींना कोपरगाव येथील करोना केअर सेंटर मध्ये हलविले होते.

त्यातील एका मुलीचा अहवाल बाधित आल्याने धोत्रे येथील ग्रामस्थांचे धाबे दणाणले आहेत. तर कोपरगाव येथील महिला डॉक्टरच्या संपर्कातील अहवाल निगेटिव्ह आल्याने कोपरगावकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान प्रशासनाकडून धोत्रे येथील काही परिसर सील करण्यात येणार असल्याचे डॉ. संतोष विधाते यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या