जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून प्रवेशद्वारात ठिय्या
अहमदनगर (प्रतिनिधी) – सप्टेंबर ते नोव्हेंबर 2019 या तीन महिन्यांचे वेतन अद्याप मिळाले नसल्याने संतप्त ग्रामपंचायत कर्मचार्यांनी ‘भीख मांगो’ आंदोलन केले. तर हा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ व ग्रामपंचायत कर्मचारी संघटना नगरच्यावतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचार्यांनी मोर्चात सहभागी होत जोरदार घोषणाबाजी करीत नागरिकांकडून भीक जमा केली असून, ही रक्कम ग्रामविकास मंत्रालयाला पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
बुरुडगाव रोड येथील भाकपच्या कार्यालयापासून संघटनेचे उपाध्यक्ष अॅड.कॉ. सुधीर टोकेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाची सुरुवात झाली. या आंदोलनात मारुती सावंत, सुरेश कोकाटे, राहुल पटेल, संजय डमाळ, सुनिल शिंदे, शरद खोडदे, उत्तम कराडे, अरुण राऊत, किरण फटांगरे, भाऊसाहेब गिरवले, ब्राम्हणे, रवींद्र पवळ, दादा कापसे, दिलीप बोरुडे, दादा साळवे, रोहिदास पेटारे, संपत चाबुकस्वार, गणेश शिंदे, संतोष अल्हाट, अनिल शिंदे आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलकांनी जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाज महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चा जिल्हा परिषदेवर वळवला. यावेळी कर्मचार्यांनी झोळी पुढे करुन भीक जमा केली. तर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात ठिय्या मांडून जोरदार निदर्शने केली.
मागील बैठकीत जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर संघटनेने पाठपुरावा करुन वेतनासाठी स्मरणपत्र देखील दिले. मात्र त्याची देखील दखल घेतली नसल्याने 15 िं ग्रामपंचायत कर्मचार्यांनी भीक मागो आंदोलन करीत जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. मागणीचे निवेदन मुख्यकार्यकारी अधिकारी शिवराज पाटील व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं. विभाग) निखिलकुमार ओसवाल यांना देऊन चर्चा करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी ग्रामपंचायत कर्मचार्यांचे थकीत वेतन मिळण्यासाठी बीडीओंना पत्र काढण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.