एसपी पाटील यांचे आदेश ; पगारासाठी निधीच नाही
अहमदनगर – पोलिसदादांचा ताण हलका करण्यासाठी बंदोबस्तासाठी दिलेले होमगार्डस तातडीने कार्यमुक्त (रिमूव्ह) करावे असा संदेश एसपी सागर पाटील यांनी दिला आहे. निधी आभावी हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.
जिल्हा पोलीस दलातील संख्याबळ पाहता सुमारे साडेतीनशे होमगार्डस पोलिसांच्या बरोबरीने बंदोबस्त करतात. नगर, पारनेर, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, राहुरी, संगमनेर, श्रीरामपूर, श्रीगोंदा, शेवगाव, राहाता, जामखेड, शिर्डी, साकरवाडी, अकोले, देवळाली प्रवरा, सावळीविहीर आणि वांबोरी पोलिसांच्या मदतीला होमगार्डस देण्यात आले आहेत.
नातळापासून (दि.25 डिसेंबर)24 फेब्रुवारी 2020 पर्यंत 19 ठिकाणच्या पोलिसांसोबत 250 पुरूष आणि 40 महिला होमगार्डस कायमस्वरुपी बंदोबस्तसाठी नियुक्त केले होते. राज्याच्या होमगार्ड महासमादेशाकाची परवानगीही त्यासाठी नगर पोलिसांनी घेतली होती. 10 जानेवारी रोजी राज्य होमगार्ड समादेशकांनी होमगार्ड बंदोबस्ताचा निधी नसल्याचे पत्र नगर पोलिसांना धाडले.
बंदोबस्तावरील होमगार्डसचा पगार निधी नसल्याने होणार नसल्याचे लक्षात येताच एसपी सागर पाटील यांनी बंदोबस्तावरील होमगार्डस रिमूव्ह करण्याचे आदेश दिले आहेत. महासमादेशकाचे आदेश प्राप्त होताच काल शुक्रवारी रात्रीच एसपी सागर पाटील यांनी होमगार्डसचा बंदोबस्त हटविण्याचे आदेश दिले.