Sunday, November 17, 2024
Homeनगरअवैध दारूविक्री; जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई

अवैध दारूविक्री; जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई

10 जणांविरुध्द गुन्हा दाखल; अकोले पोलिसांची कामगिरी

अकोले (प्रतिनिधी) – बेकायदेशिर दारूविक्रीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली अकोले पोलिसांनी तालुक्यातील विविध ठिकाणी छापे टाकून पाच जणाविरुध्द तसेच विविध ठिकाणच्या जुगार अड्ड्यांवर छापे टाकून 5 जणांविरुध्द अकोले पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

- Advertisement -

चास, अगस्ती थिएटरसमोर, इंदोरी शिवारातील हॉटेल सह्याद्री येथे टाकलेल्या छाप्यात 7502 रुपयांची दारू व 32 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल असा ऐवज पोलिसांनी जप्त करत पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 65 ई, अ, प्रमाणे गुन्हे दाखल केले आहे.
चास शिवारात एका छपराच्या आडोशाला शिवाजी राजाराम साळुंके (रा. पिंपळदरी, ता. अकोले) हा बेकायदेशिर दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. त्यामुळे 1 हजार रुपये किंमतीची गावठी हातभट्टीची दारू मिळून आली. पोलिसांना पाहताच आरोपी पळून गेला. पोलीस शिपाई कुलदीप पर्वत यांच्या फिर्यादीवरून साळुंके विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोल्यातील अगस्ती थिएटरसमोर रमेश आण्णा शिंदे (रा. शाहूनगर, अकोले) हा बेकायदेशिररित्या दारू विक्री करतांना मिळून आला. त्याच्याकडून 2 हजार 82 रुपयांची देशी दारुच्या 40 बॉटल व 32 हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस शिपाई विठ्ठल शेरमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रमेश शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदोरी शिवारात हॉटेल सह्याद्री येथे सोमनाथ श्रावण दिघे (रा. शिरसगाव धुपे, ता. संगमनेर), अनिल रघुनाथ साळगट (रा. बिरेवाडी, ता. संगमनर), सचिन सुदाम जाधव (रा. संगमनेर) हे तिघे जण बेकायदेशिररित्या दारू विक्री करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. त्यामध्ये देशी बॉबी संत्राच्या 4 हजार 420 रुपये किंमतीच्या बाटल्या मिळून आल्या. पोलिसांनी सोमनाथ दिघे व अनिल साळगट यांना ताब्यात घेतले असून सचिन जाधव हा फरार झाला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल धनंजय गुडवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक ढोमणे, पोलीस हवालदार बी. बी. भोसले, पोलीस हवालदार वाघ, सहाय्यक फौजदार शेख करत आहेत.

तसेच विनापरवाना व स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे स्वीकारून कल्याण मटका चालविणार्‍या अड्ड्यांवर अकोले पोलिसांनी शनिवारी छापे टाकले. या छाप्यात 5 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून 3 हजार 605 रुपये रोख रक्कम व जुगारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

देवठाण शिवारात आडोशाला पत्र्याचे शेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात सोमनाथ बारकू उघडे (रा. गिरगाव, ता. अकोले), राजू वसंत बोडके (रा. देवठाण, ता. अकोले), गणेश नामदेव बोडके (रा. देवठाण) हे पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा हारजीतीचा जुगार खेळतांना पत्ते व रोख 1720 रकमेसह मिळून आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विजय आगलावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोले बस स्थानकाच्या सार्वजनिक शौचालयाच्या पाठीमागे अमोल दिगंबर झोळेकर (रा. धुमाळवाडी) हा विनापरवाना बेकायदा आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या देवून कल्याण मटका नावाचा जुगार खेळवितांना मिळून आला. त्याच्याकडून 715 रुपये रोख व मटक्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विठ्ठल शेरमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन झोळेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समशेरपूर शिवारात फाट्यावर झाडाच्या आडोशाला अभिजीत भाऊसाहेब आल्टे (रा. समशेरपूर, ता. अकोले) हा कल्याण मटका खेळवितांना मिळून आला. त्याच्याकडून 1170 रुपये रोख व जुगार साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र संपत वलवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका सय्यद, पोलीस हवालदार वाघ, पोलीस नाईक गोराणे करत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या