आशा दिघे यांचा राजीनामा : जिल्हाधिकार्यांसमोर नव्याने नोंदणी
अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गटनेत्या (प्रतोद) आशा बाबासाहेब दिघे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागेवर सभापती अजय फटांगरे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. फटांगरे यांची गटनेतेपदी निवड करून शुक्रवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या समोर फटांगरे यांच्या निवडीची नोंदणी करून त्यांच्या प्रती विभागीय महसूल आयुक्तांना पाठविण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडी येत्या 31 डिसेंबरला होणार आहेत. त्यापूर्वीच 21 डिसेंबरला काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषदेतील गटनेत्या आशा दिघे यांनी व्यक्तीगत कारणामुळे त्यांच्या गटनेते पदाचा राजीरामा दिला होता. त्यानंतर पक्षाकडून नवीन गट नोंदणीसाठी काँग्रेसच्या सदस्यांना 22 डिसेंबरला नोटीस पाठविण्यात आली.
या नोटीसनंतर 26 डिसेंबरला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात आणि प्रभारी मोहन जोशी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची मुंंबईत बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाच्या 23 पैकी 13 सदस्य उपस्थित होते. त्या ठिकाणी सभापती फटांगरे यांच्या नावावर एकमत होऊन त्यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली.
येत्या 31 तारखेला होणार्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडी दरम्यान काँग्रेस पक्षाकडून येणारा आदेश मी पक्षाच्या सदस्यांना व्हिपच्या माध्यमातून बजाविणार आहे. काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांना हा आदेश बंधनकारक राहणार आहे.
सभापती अजय फटांगरे, गटनेता, काँग्रेस.